

लासलगाव ( नाशिक ) : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांत कांदा दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी १,१५० रुपये, तर लाल कांद्याला सरासरी १,३५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला होता. मात्र, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि कमी बाजारभाव या तिहेरी माऱ्यामुळे त्यांच्या सर्व आशा मातीमोल ठरल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अतिवृष्टीमुळे साठवणीतील तब्बल ३० ते ४० टक्के कांदा खराब झाला असून, वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. साठवणूक खर्च आणि नुकसान वजा गेल्यानंतर मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते हतबल झाले आहेत.
बांगलादेशातील घाऊक बाजारात कांदा दर १०० रुपये किलोच्या घरात पोहोचल्याने तेथील ग्राहकांना महागात कांदा घ्यावा लागत आहे, तरीही भारताकडून कांदा आयातबंदी उठवण्याबाबत कोणतीही सकारात्मक हालचाल झालेली नाही. केंद्र सरकारने बांगलादेशाशी तातडीने चर्चा करून आयातबंदी हटवावी, जेणेकरून निर्यात पुन्हा सुरू होईल. निर्यात सुरू झाल्यास भारतीय कांद्याला किमान २ ते ५ रुपये प्रतिकिलो दरवाढ मिळू शकते. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.
दरकपातीची प्रमुख कारणे अशी...
नाफेड व एनसीसीएफचा बंपर कांदा १० रुपये किलोने उपलब्ध
कर्नाटक व आंध्रातून वाढली आवक
बांगलादेशकडून आयातबंदी कायम
उन्हाळ कांद्याची मोठी लागवड व मागणी घट