

इंदिरानगर (नाशिक) : इंदिरानगरातील पिंगळे चौकाजवळ एका इमारतीच्या खोदकामातील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात बुडून एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
पिंगळे चौकाजवळ एका इमारतीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तेथील मोठ्या खड्ड्यांमध्ये १० ते १५ फूट पाणी साचले आहे. तेथे लाइटची व्यवस्था नसल्याने संपूर्ण अंधार आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणाहून जाणारा कैलास अर्जुन चोपडे (रा. बडदेनगर) याला अंधाराचा अंदाज न आल्याने पाय घसरून तो खड्ड्यात कोसळला. त्याला पोहता येत नसल्याने त्याने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. परंतु त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग तसेच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोपडेला बाहेर काढले. विशेष म्हणजे या बांधकाम प्रकल्पाभोवती सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतेही कपाउंड करण्यात आले नसल्याने कैलास चोपडे याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना आढळले.