

नाशिक : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातात बळी जाणाऱ्यांच्या वाढत्या संख्येविषयी तीव्र चिंता व्यक्त करत महापालिकेतील अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. ३१) निर्वाणीचा इशारा दिला. रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत याची जबाबदारी सर्वस्वी महापालिकेचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर असल्याचे नमूद करत कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाई करण्याचा 'अल्टिमेटम' महाजन यांनी दिला. आठवड्यातील तीन दिवस नाशिकमध्येच ठिय्या मांडणार असल्याचे सांगताना येत्या आठवडाभरात नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याची ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.
एकिकडे सिंहस्थ कामांमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदण्यात आले असताना पावसामुळेही कॉलनीअंतर्गत रस्त्यांचीही दैना उडाल्याने वाढते अपघात नाशिककरांच्या जीवावर उठले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी शुक्रवारी (दि. ३१) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात बैठक घेत खड्डेमय रस्ते व त्यावर महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्यासह लोकप्रतिनिधींशी शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्त्यांवरील खड्यांची वस्तुस्थितीची कबुली देताना महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साहित्याची कमतरता, एमएनजीएलसह अन्य यंत्रणांचा असहकार तसेच निविदा प्रक्रियेत आलेल्या अडथळ्यांमुळे प्रशासनावर ओढावलेली नामुष्कीची कबुलीही आयुक्तांनी दिली. यावर मंत्री महाजन यांनी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे प्रशासनाला आदेश देताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
माती मुरूमाद्वारे बुजविल्या जाणाऱ्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर चिखल निर्माण होऊन अपघात वाढत असल्यामुळे डांबरमिश्रित साहित्यानेच खड्डे बुजविण्याचे तसेच प्रत्यक्ष स्पॉटवर अधिकाऱ्यांनी थांबून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक वळविताना शहर वाहतूक पोलिस शाखेने दिशादर्शक फलकांसह आवश्यक उपाययोजना करण्याच्या तसेच अलर्ट राहण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या
कॉलनी रस्त्यांसाठी डीपीआर
आ. फरांदे, आ. ढिकले, आ. सीमा हिरे तसेच महापौर आहेर-आडके यांनी कॉलनीअंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न मांडला. मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कॉलनी अंतर्गत रस्त्यांवरून वळविल्याने अवजड वाहनांमुळे कॉलनीअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉलनीअंतर्गत रस्त्यांच्या पुनर्विकासासाठी १,२०० ते १,५०० कोटींची आवश्यकता असल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले. यावर कॉलनीअंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी शासनाला डीपीआर सादर करण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले.
शहर अभियंता अग्रवाल यांना नोटीस
रस्त्यांवरील खड्यांसंदर्भात मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीस बांधकाम विभागाचे प्रमुख असलेले शहर अभियंता संजय अग्रवाल यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. अग्रवाल यांच्या अनुपस्थितीविषयी महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अग्रवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.
कामांच्या दर्जाविषयी शंका
सिंहस्थांतर्गत रस्त्यांच्या कामांच्या निविदा ३० ते ३५ टक्के कमी दराने गेल्याने मंत्री महाजन यांनी या रस्त्यांच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. सहा महिन्यांत सर्व रस्ते कामे पूर्ण होतील. त्यानंतर पुढील २५ वर्षे खड्यांचे प्रश्न भेडसावणार नाही, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.