नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महिला, मुलींची छेड काढणाऱ्या व शाळा सुटल्यानंतर शाळेजवळ थांबणाऱ्या टवाळखोरांना दामिनी मार्शल्स आणि निर्भया पथकाने चांगलीच अद्दल घडविली आहे. या पथकाने गेल्या महिनाभरात शहरातील विविध भागांमधील तब्बल ४७९ टवाळखोरांवर कारवाई केली असून, स्टॉप ॲण्ड सर्च कारवाईत ७३ मजनू आढळले आहेत. तसेच पथकाने शहरातील विविध १४ शाळा, महाविद्यालये, क्लासेसना भेट देऊन त्याठिकाणी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा आढावा घेताना, टवाळखोरांना इशारा दिला आहे.
शहरात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दामिनी मार्शल्स आणि निर्भया पथकाने चोख जबाबदारी पार पाडली. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार, दामिनी पथकाने पंचवटी विभागात तब्बल १७७ टवाळखोरांवर कारवाई केली आहे. सरकारवाडा विभागात ६६, अंबड विभागात ५२, तर नाशिकरोड विभागात तब्बल १८४ टवाळखोरांना दंडुका दाखविला आहे. याव्यतिरिक्त स्टॉप ॲण्ड सर्च कारवाईत पंचवटी विभागात १९, सरकारवाडा विभागात १७, अंबड २१, तर नाशिकरोड विभागात १६ रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. या व्यतिरिक्त या चारही विभागांतील १४ शाळा, महाविद्यालये व क्लासेसना भेटी देऊन, मुलींच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. या कारवाईचा धसका शहरातील टवाळखोरांनी घेतला आहे. दरम्यान, यापुढेदेखील पथकांकडून कारवाई केली जाणार असल्याने, टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
दामिनी मार्शल्स आणि निर्भया पथकाने गेल्या महिनाभरात हरविलेल्या २५ जणांचा मोठ्या शिताफीने शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाइकांकडे सुखरूप सुपूर्द केले आहे. पंचवटी विभागात आठ, नाशिकरोडमध्ये १५, तर सरकारवाडा आणि अंबड विभागात प्रत्येकी एका मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्यास पथकाला यश आले आहे.