

नाशिक : जिल्ह्यात पावसाचे सरासरी प्रमाण चांगले असल्याने जिल्ह्यातील धरणांनी 90 टक्क्यांची सरासरी ओलांडली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 13 धरणे ओव्हरफ्लो झाली असून विसर्ग कायम आहे. गंगापूर धरणांतून सध्या 1442 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि घाटमाथ्याच्या परिसरातही चांगलाच पाऊस होत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातही चांगला पाऊस होत असल्याने अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यातील सरासरीपेक्षा केवळ 60 टक्के पावसाचीच नोंद आतापर्यंत करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात सरासरी 232.5 मिलिमीटर पावसाची नोंद केली जाते. यंदा मात्र 27 ऑगस्ट उलटल्यानंतरही 140.6 इतक्याच पावसाची नोंद झाली. काही तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी मालेगाव, बागलाण, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे.
जून महिन्यापासून ऑगस्ट अखेरपर्यंत विचार केला असता सरासरीच्या 78.8 टक्के पावसाची नोंद झाली असून तीन महिन्यात 564.7 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. अद्यापही पावसाचा एक महिना बाकी असून महिनाभरात पाऊस सरासरी गाठेल अशी दाट शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असतानाही धरणामध्ये मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जास्त साठा दिसून येतो आहे. तब्बल तेरा धरणांनी शंभरी गाठली असून इतरही सर्व धरणे 80 ट़क्क्यांच्या पुढे गेली आहे. मागील वर्षी 83 टक्के असलेला साठा यंदा 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडीकडे आत्तापर्यंत 6 लाख 53 हजार 717 क्युसेक वेगाने 56 टीएमसी पाणी रवाना झाले आहे.
धरण- विसर्ग
दारणा- 63804
गंगापूर- 1442
कश्यपी- 320
वालदेवी- 407
आळंदी- 446
भावली- 481
भाम- 879
वाघाड- 972
तीसगाव- 61
करंजगाव- 1130
पालखेड- 796
पुनेगाव- 150
ओझरखेड- 228
नांदुरमधमेश्वर- 12260
वाकी- 196
कडवा- 1176
गौतमी गोदावरी- 228