नाशिक : दै. 'पुढारी' ने नारीशक्ती पुरस्कार देऊन आमच्या कार्याची दखल घेतली. हा पुरस्कार स्त्री सन्मानासह त्यांच्या कर्तृत्वाला नवीन पंख देणारा असून, पुरस्काराने यापुढील कार्यात अधिक ऊर्जा मिळणार असल्याची प्रतिक्रिया पुरस्कारार्थींनी व्यक्त केल्या.
जागतिक मातृदिनानिमित्त 'पुढारी'ने नाशिकसह जिल्ह्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यथोचित व हृदय सत्कार शुक्रवारी (दि. २३) केला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व आदिवासी विकास महामंडळाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी नारीशक्तीला सन्मानित केले. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थी महिलांनी 'पुढारी' च्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
स्थूल शरीराला सडपातळ आणि सुडाैल करण्यासाठी एन्डोस्फिअर्स थेरपी देऊन महिलांना सौंदर्य बहाल करणाऱ्या डॉ. वर्षा चिट्टीवाड म्हणाल्या की, 'पुढारी'तर्फे दिला जाणारा नारीशक्ती पुरस्कार आणि तोही अत्यंत कर्तृत्ववान अशा राजकीय 'पुढारी' विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मिळतोय, हा आयुष्यातील संस्मरणीय ठरणारा कार्याला नवे पंख देणारा पुरस्कार आहे. महिलांचे आरोग्य शारीरिक सक्षमीकरणासाठी मिळालेल्या या पुरस्काराबद्दल 'पुढारी'ला धन्यवाद देते.
दुष्काळग्रस्त सिन्नर तालुक्यात जलसंधारण तंत्राचा लीलया वापर करून जलव्यवस्थापनाचा नवा मार्ग दाखवणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पोटे यांनी 'पुढारी'ने नारीशक्तीचा अत्यंत उचित गौरव केला असल्याचे सांगून भविष्यात काम करताना पुरस्काराने अधिक ऊर्जा मिळणार असल्याचे सांगितले. 'नारीशक्ती' पुरस्काराने आता जबाबदारी अधिक वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगला प्रारंभ करून १२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू म्हणून जागतिक स्तरावर नाव कमावणारी दुर्गा गुंजाळ ही पुरस्काराने भारावून गेली होती. 'पुढारी'चा 'नारीशक्ती पुरस्कार' माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. त्याने कायम प्रेरणा मिळत राहील असे ती म्हणाली.
भारतीय संस्कृतीने सदैव नारीशक्तीचा सन्मान केला. गार्गी, मैत्रेयीपासून आजच्या चांद्रयान- ३ पर्यंत महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रवास बघितला, तर त्या सर्वच क्षेत्रांत आघाडी मिळवताना दिसतात. महिला सक्षम झाल्याशिवाय देशाची प्रगती अपूर्ण आहे. संधी, सन्मान आणि सुरक्षा मिळणे हा महिलांचा अधिकार आहे. ज्यांचा सत्कार झाला, त्यांच्या कर्तृत्वात शिक्षणाचा मोठा वाटा आहे. आपल्या कामाची दखल कुणी घेतली, तर अधिक जोमाने, नवप्रेरणेने काम करायला बळ मिळते. महिलांच्या कार्याची दखल घेऊन 'पुढारी', नारीशक्ती पुरस्काराने हेच काम करत आहे. 'पुढारी'चे मनस्वी आभार, अशी भावना डॉ. दीप्ती देशपांडे यांनी पुरस्काराला उत्तर देणारा व्यक्त केली. त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारलेल्या डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी हा संदेश वाचून दाखविला.
सन्मान सोहळ्यात पुरस्कार्थींच्या कुटुंबातील अनेक सदस्यही उपस्थित होते. आपली आई, पत्नी, मुलगी, सुन यांचा हृद्य सत्कार पाहताना कुटुंबातील सदस्यांचा उर अभिमानाने भरुन आला होता. काही पुरस्कारार्थी महिलांनी आपल्या प्रियजनाना मंचावर बोलवून कुटुंबासह पुरस्कार स्वीकारला. सोहळ्यानंतर अनेक पुरस्कारार्थींंनी सन्मानचिन्ह हातात घेऊन प्रियजनांसह फोटोसेशन केले. अनेकींनी पुरस्कारची ट्रॉफी हातात घेऊन सेल्फीही काढल्या.