नाशिक : ध्येय, कर्तृत्व, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजात लौकीक निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान नारीशक्तीचा ‘दै. पुढारी’ने हृदयसोहळ्यात अग्रगण्य सन्मान करीत, तिच्याविषयी कृतज्ञ भाव व्यक्त केला.
‘कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व’ या क्षेत्रात भरारी घेणाऱ्या महिला एकाच व्यासपीठावर अवतरल्याने खऱ्या अर्थाने नारी‘शक्ती’चा प्रत्यय आला. तर ‘स्त्री सन्मानासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज असून, 'दै. पुढारी'तर्फे आयोजित सन्मान तिच्या ‘आऊटस्टॅण्डिंग’ कार्याची पावती असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.
'दै. पुढारी'तर्फे शुक्रवारी (दि. २३) हॉटेल एनराईज - बाय सयाजी येथे जागतिक मातृदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात नारीशक्तीचा यथोचित गौरव करण्यात आला. सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. गोऱ्हे, आदिवासी विकास महामंडळाच्या आयुक्त लीना बनसोड उपस्थित होत्या. व्यासपीठावर ‘दै. पुढारी’चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, युनिट हेड राजेश पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, समाजासाठी दिलेल्या योगदानाविषयी जेव्हा पुरस्कार मिळतात, तेव्हा आपल्या कामाची दखल घेतल्याचा अत्यानंंद होत असतो. येथे उपस्थित महिलांनी नेहमीपेक्षा सामाजिक कार्य वेगळ्या पद्धतीने केले, त्याचीच पोचपावती ‘दै. पुढारी’ने दिली. कारण हल्ली सन्मान करताना, आपण काम करतोय की नाही, हे आधी तपासून बघितले जाते. त्यानंतरच आपल्यावर विश्वास टाकला जातो. मी अगोदर आयुर्वेदीक डॉक्टर म्हणून काम केले. राज्य महिला आयोगाची सदस्यही होते. त्यानंतर चार वेळा विधान परिषदेवर संधी मिळाल्याचा दाखला डॉ. गोऱ्हे यांनी दिला.
आज जेव्हा हुंडाबळी, घरगुती हिंसाचाराच्या घटना कानी पडतात, तेव्हा वाईट वाटते. आपली आर्थिक स्थिती सुधारली मात्र, आपण सुसंस्कृत झालो नसल्याची भावना निर्माण होते. स्त्रीने एकटीने जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास, समाजाकडून तिच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे तिच्यावर कळत-नकळत ओझे निर्माण होते. ‘ते’ कसेही असले तरी, तिथेच नांदले पाहिजे, सहन केले पाहिजे, या वृत्तीत आजही बदल झाला नाही. त्यातूनच कौटुंबिक छळाची विकृती जन्माला येते. हे सर्व आश्चर्यचकीत करणारे आहे. समाजात काही पुरुष वर्गाच्या मानसिकतेत बदल होत आहे. विशेषत: कोविडनंतर हा बदल प्रकर्षाने दिसून आला. या काळात अनेक पुरुषांनी न लाजता स्त्रियांची कामे केलीत. खरं तर नारीशक्ती सन्मान म्हणजे केवळ पुरुषांनी महिलांचे काम करणे किंवा महिलांनी पुरुषांची कामे करणे असा होत नसून, कुटुंब व्यवस्था आणि समाजाने विचारसणीत बदल करून स्त्रिच्या योगदानाचा सन्मान केला पाहिजे. तसेच सरकारने देखील ‘समानता’ रुजविण्यासाठी या गोष्टी आणखी सोप्या होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
प्रास्ताविकात निवासी संपादक सजगुरे म्हणाले, ‘बालवयात यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या चिमुकलीपासून ते वयाच्या पंचाहत्तरीत कार्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याची संधी ‘दै. पुढारी’ने साधल्याचे समाधान वाटते. प्रेरणादायी महिलांना हा पुरस्कार देताना आम्हाला खरोखरच अत्यानंद होत आहे.
दरम्यान, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘दै. पुढारी’तर्फे काढलेल्या ‘नारीशक्ती’ पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन सोनाली म्हसराळे यांनी केले, तर आभार जाहिरात प्रतिनिधी प्रणव जोशी यांनी मानले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी, ‘दै. पुढारी’च्या नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे कौतुक करताना, ‘नारीशक्ती सन्मान आपल्या कुटुंबात आला आहे’ असे म्हणत उपस्थित सन्मानार्थींसह सोबत आलेल्या कुटुंबियांना आपल्या पाठीवर हात ठेऊन ते थोपाटण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी आपली पाठ थोपटून घेत, समाधान व्यक्त केले.
नारीशक्ती सन्मानविषयी जेव्हा भविष्यात बोलले जाईल, तेव्हा ‘दै. पुढारी’ने केलेले प्रयत्न नक्कीच स्मरणात राहतील. नारीशक्ती पुस्तिकेचे जेव्हा वाचन केले जाईल, तेव्हा या कामासाठी देखील प्रयत्न करावे लागल्याचे, दाखले दिले जातील. सध्या आपण संक्रमण व्यवस्थेतून जात असून, ‘दै. पुढारी’चे कार्य भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल, असे गौरद्गारही डॉ. गोऱ्हे यांनी काढले.
दुर्गा दिलीप गुंजाळ (क्रीडा)
डॉ. मनीषा योगेश आव्हाड (वैद्यकीय)
डॉ. दीप्ती देशपांडे - स्नेहा रत्नपारखी (शिक्षण)
विजया सुभाष देशमुख (शिक्षण)
अर्चना कासलीवाल (राजकीय)
कलावती भिवा वाघ (सामाजिक)
भाग्यश्री प्रशांत शिंदे (वैद्यकीय)
बबिता दिलीप सूर्यवंशी (शिक्षण)
दिपाली बोरा व राखी बोरा (बांधकाम व्यावसायिक)
डॉ. वर्षा श्रीनिवास चिट्टीवाड (वैद्यकीय)
डॉ. काजल पराग पटणी (योग)
आसावरी देशपांडे (सामाजिक)
शोभा पवार-साळवे (बालहक्क)
मनीषा पोटे (जलसंधारण)
पूजा नीलेश गायधनी (ललित कला)
प्रियंका श्रीकांत काकड (शिक्षण)
लक्ष्मीताई मधुकर मोरे (कृषी)
सुवर्णा राहुल नागरे (कृषी)
सोनिया भगवानदास ओछानी (उद्योजिका)
शीतल व किमाया उगले (लेखिका)
मेनका रमेश चौधरी (व्यावसायिक)
सविता करण गायकर (सामाजिक)
डॉ. हिमानी संदीप शिंदे
शिवानी विलास देसले (व्यावसायिक)
लीना समाधान पाटील (राजकीय)
जयश्री अरविंद राठी (जाहिरात)