

मागील सिडकोरीया आठवड्यातच पेलिकन पार्कच्या पाठीमागील बाजूस शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कोयत्याने वार करून त्याला गंभीररीत्या जखमी केल्याचा प्रकार ताजा असतानाच शनिवारी रात्री अंबड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मीनगर परिसरात मागील वादाची कुरापत काढत एका युवकावर कोयत्याने वार करत खून करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेनंतर अर्ध्या तासाच्या आत दोन्ही संशयित ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हिरवाळे (२९, रा. चुंचाळे) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुलदीप उचित (२६) व विशाल हिरवाळे (२९) हे दोघे मित्र एकत्र मद्यप्राशन करत होते. यात कुलदीपची पत्नी माहेरी गेली असल्याने विशाल त्याला कायम चिडवत होता. चिडलेल्या कुलदीपने मित्र पीयूष वाघ (वय २०, रा. चुंचाळे) याला कोयता आणायला सांगितले. पीयूष कोयता घेऊन येताच कुलदीपने विशालवर कोयत्याने वार केले. यात विशालचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी त्वरित तपास करून संशयित आरोपी कुलदीप उचित आणि पीयूष वाघ यांना ताब्यात घेऊन अटक केली.