नाशिक : कारमधून अवैधरीत्या मद्यवाहतूक करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले आहे. त्यांच्याकडून केंद्रशासित प्रदेशात बनवलेला मद्यसाठा जप्त केला आहे. पिंपळगाव बसवंत टोलनाका येथे पथकाने कामगिरी केली.
कळवण विभागाच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टोलनाका येथे सोमवारी (दि.१२) सापळा रचला. (जीजे ०५ सीएम १०५१) क्रमांकाच्या कारचालकास कार थांबवण्यास सांगितले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शासकीय वाहनाने त्यांची कार अडवत कारमधील तिघांनाही पकडले. कारची झडती घेतली असता कारमध्ये दमण निर्मित २२ खोके मद्यसाठा आढळून आला. हा मद्यसाठा फक्त दमण येथेच विक्री करता येतो. त्यामुळे पथकाने वाहन जप्त करीत संशयित मन्सुरी मोहमंद फिरोज मिया मोहमंद (५४), नालाबांद मोहमंद अयुब सरफराज (४३) व मुल्ला मोहमंद अस्पाक गुलामकादर (२९, तिघे रा. सुरत, राज्य गुजरात) यांना अटक केली आहे.
तिघांसह त्यांना अवैध मद्यसाठा पुरवणारे व त्यांच्याकडून मद्य खरेदी करणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने तिघांकडून कारसह मद्यसाठा असा एकूण ११ लाख ९१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक एम. डी. कोंडे, सहायक दुय्यम निरीक्षक एस. के. शिंदे, जवान दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विलास कुवर, गोरख गरुड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.