नाशिक : चंदन चोरट्यांची मजल पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थान आवारात चंदन चाेरीचा प्रयत्न करण्यापर्यंत गेल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी सोमवारी (दि. ५) शासकीय निवासस्थान आवारात शिरून चंदन वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हटकले असता तसेच पोलिस जमा होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी भिंतीवरून उड्या मारून पळ काढला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चंदन चोरट्यांच्या टोळीतील दोघांना अटक केल्यानंतर घटनेच्या पाच दिवसांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात उगलाल प्रधान चौरे (रा. पेठ रोड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. ५) मध्यरात्री 3 च्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या सीबीएस येथील शासकीय निवासस्थान आवारात सहा चोरटे शिरले होते. त्यांनी हातात रॉड, दांडके, दगड, कटर मशीन घेऊन चंदनाचे झाड तोडून चंदन चोरी करण्यासाठी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आवारात आले होते. मात्र सुरक्षेवरील पोलिस सतर्क झाल्याने त्यांचा डाव फसला. पोलिस जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी या टोळीतील दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातून पकडल्यानंतर चोरट्यांविरोधात दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा घडल्यानंतर पाच दिवसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ओझर येथील चंदन चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक केल्यानंतर तपासात शासकीय निवासस्थानावरील दरोड्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय निवासस्थानावरील सुरक्षारक्षक जागा झाल्यानंतर त्याने चोरट्यांना हटकले. मात्र चोरट्यांनी त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून चंदन वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. इतर पोलिसही जागे झाल्यावर चोरट्यांनी तेथून पळ काढला. या घटनेने पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाभोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही सुमारे दोन वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षक, उपायुक्तांच्या शासकीय निवासस्थानाजवळूनच २५ किलो चंदन चोरट्यांनी लुटले होते, तर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या शासकीय निवासस्थान आवारातून चंदन चोरी झाली होती. त्यामुळे पोलिसांच्या शासकीय निवासस्थान आवारात जाऊन चोरटे चोरी करीत असल्याने पोलिसांच्याच सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातून नवापूर पोलिस ठाणे कोठडीतील मागील बाजूस असलेल्या शौचालयाची दगडी खिडकी तोडून डिसेंबर २०२२ मध्ये सहा संशयित पळाले होते. त्यात चंदन चोरट्यांचा म्होरक्या गौसखाँ हानिफखाँ पठाण (रा. ब्राह्मणी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याचाही समावेश होता. तो म्होरक्या असून, त्याच्या मार्गदर्शनाखाली इतर सराईत चोरटे चंदन चोरी, दरोडे टाकत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थान आवारातून चंदन चोरीचा डाव फसल्याने चोरट्यांनी सातपूर येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आवारात जाऊन सुरक्षारक्षकास कटरचा धाक दाखवून चंदन वृक्ष तोडून बुंधा घेऊन पळ काढला. याप्रकरणीही सातपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.