

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल, असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या तिघा सराईतांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.
चुंचाळे पोलिस चौकी हद्दीतील आदित्य देवानंद पांडे (२३, रा. घरकुल याेजना, चुंचाळे, अंबड), वैभव ऊर्फ बाळा अशोक राजगिरे (२०, घरकुल योजना, चुंचाळे, अंबड) तसेच देवळाली कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील दीपक चिंतामण भालेराव (२२, रा. हाडोळा, देवळाली कॅम्प) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, आदित्य पांडे व वैभव राजगिरे या दोघांवर चुंचाळे परिसरात दहशत कायम पसरवणे, सर्वसामान्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दराेडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून येणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, चोरी, घरफोडी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दीपक भालेराववर गैरकायद्याची मंडळी जमवून घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे आदी गुन्हे दाखल आहेत.
हे तिघेही शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल, असे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सचिन बारी यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. आगामी निवडणूक तसेच सण-उत्सव लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा :