Nashik Crime News | लुटारुंना नागरिकांनीच पाठलाग करुन पकडलं, पोलिसांच्या केलं स्वाधीन

Nashik Crime News | लुटारुंना नागरिकांनीच पाठलाग करुन पकडलं, पोलिसांच्या केलं स्वाधीन

देवळा : पुढारी वृत्तसेवा-  प्रवाशांची लूट करून पळून जाणाऱ्या संशयितांना जागरूक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यात रस्त्यावरच्या युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याने चारही संशयित आरोपींना देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर हा गुन्हा मालेगाव हद्दीत झाल्याने सदर संशयित आरोपींना मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

पकडण्यात आलेले संशयित

मुस्तफा पठाण (३२), नईमखान (२९), सोहेब पठाण (३२) , नवाजखान पठाण (३०) रा. सुरत

याबाबत मिळालेली माहिती अशी की, टाकळी ता.मालेगाव येथील रामदास शेवाळे हे पत्नीसमवेत सौंदाणे ता.मालेगाव येथून नाशिकला जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी मारुती इको गाडी ( जीजे२६ एबी४१९३) ला हात दिला असता ते या गाडीत बसले. थोडे अंतर गेल्यावर या गाडीतल्या इसमांनी त्यांच्याकडून १४ हजार रुपये व इतर ऐवज काढून घेतला व त्यांना उतरून देत गाडी परत मालेगावकडे वळवली. श्री. शेवाळे यांनी प्रसंगावधान दाखवत झालेला प्रकार मुंगसे येथील डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना फोनवर कळवला. डॉ. सूर्यवंशी यांनी गावातील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेत सदर गाडी मुंगसेजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिवेगामुळे ते शक्य झाले नाही. हार न मानता येतील डॉ.सूर्यवंशी, पंकज शेवाळे, सागर सयाजी, निलेश दामू, दर्शन शिवाजी, योगेश भामरे, प्रकाश सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी तसेच मेशी येथील सरपंच बापू जाधव, शरद सूर्यवंशी, मोहन बोरसे, प्रवीण शिरसाठ व इतरांनी इतर वाहनांच्या साहाय्याने पाठलाग करत पाटणे, महालपाटणे, मेशी या गावांमध्ये गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वेगवेगळे मार्ग धरत असल्याने व वेग खूप असल्याने आव्हानात्मक झाले होते. पण तरीही यावर मात करत या संशयित आरोपींना देवळा मार्गावर पकडण्यात यश आले. याबाबत या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे. यात एकूण चार आरोपी असून देवळा पोलिसांनी त्यांना मालेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे.

देवळा : या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती इको वाहन (छाया ; सोमनाथ जगताप)
देवळा : या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती इको वाहन (छाया ; सोमनाथ जगताप)

देवळा पोलिसांची माहिती सांगण्यास उदासीनता

याबाबत संबंधित आरोपींना देवळा पोलीस ठाण्यात जवळपास तीन ते चार तास ठेवण्यात आले होते. त्यांनंतर त्यांना मालेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधिंनी देवळा पोलिसांशी संपर्क साधून घटनाक्रम,आरोपींची माहिती व नावे विचारली असता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी एकमेकांची नावे दाखवत माहिती देण्यास टाळाटाळ केली. यामुळे देवळा पोलिसांबाबत साशंकता निर्माण झाल्याने सदर घटनाक्रम व इतर माहिती मालेगाव येथून मिळवावी लागली.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news