

चांदवड : सातवर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे शनिवारी (दि.17) उघडकीस आली. घटनेतील संशयितास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात पोक्सो, अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ रविवार (दि. 18) ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला. संशयितास रविवारी (दि.18) रोजी न्यायालयात केले असता, न्यायालयाने त्याला २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वडनेरभैरव येथील सातवर्षीय मुलाचे गुरुवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण आटोपून घरी परतताना कोकणटेंभी येथील संशयित किशोर (बाळा) बाळू मोकणे (२०) याने अपहरण केले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत शनिवारी (दि. १७) संशयितास ताब्यात घेतले असता, त्याने चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, मनमाडचे पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, दिंडोरीचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, निफाडचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव, सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे हे वडनेरभैरव येथे तळ ठोकून होते.
चिमुकल्याला न्याय मिळावा यासाठी रविवारी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत सायंकाळच्या सुमारास गावातून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. माेर्चात मुले, मुली, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी चिमुकल्याच्या तीन बहिणींनी पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.