नाशिक : नाशिक रोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर्स या दुकानासमोर भरदिवसा ४० वर्षीय प्रमोद वाघ यांचा खून करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या 12 तासांत जेरबंद केले. गोपनीय माहितीनुसार, वडाळा गाव येथून मुख्य संशयित आरोपी सद्दाम मलिकला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (man murdered in Nashik over old dispute)
शुक्रवारी (दि. २) नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत प्रमोद केरूजी वाघ (४०) हे परिसरातील यश टायर्ससमोर असताना संशयित योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर सद्दामने टायर दुकानातील ब्रेक लॉकच्या लोखंडी सळईने प्रमोद वाघ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर मारहाण करीत त्यांना गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रमोद वाघ यांचे आतेभाऊ ऋतिक रमेश पगारे (२४, किरणनगर, चेहेडी शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश पगारे व सद्दाम मलिक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध घेण्याबाबतच्या सूचना गुन्हे शाखा पथकाला दिल्या. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत सद्दाम मलिकचा शोध तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला. तसेच पोलिस हवालदार विशाल काठे यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्दाम मलिक वडाळा गावात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, पोलिस नाईक विशाल देवरे, समाधान पवार या पथकाला संशयिताच्या शोधासाठी रवाना केले. तो वडाळा गावातील राजवाडा परिसरात लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार, पथकाने सद्दाम सलीम मलिक (३३, मंदाकिनी चाळ, अरांगळे मळा, मोहिते हॉटेलसमोर, एकलहरे रोड) याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, सद्दामने चौकशीदरम्यान साथीदार संशयित योगेश पगारे (रा. चेहेडी) याच्या मदतीने जुन्या वादातून प्रमोद वाघला जिवे मारल्याची कबुली दिली.
पथकाने वडाळागाव परिसरात भरपावसात रात्रभर संशयिताचा शोध घेतला. संशयित वेळोवेळी ठिकाण बदलून फिरत असल्याने, पथकाला त्याच्या प्रत्येक ठिकाणावर जावे लागले. संशयिताने वेश बदलून नाशिक रोड, इंदिरानगर, वडाळा गाव, मुंबई नाका, नानावली आदी परिसरात ठिकाणे बदलली होती.
सद्दाम मलिक हा रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याच्याविरुदण, दरोडा, धमकावणे आदींसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.