इगतपुरी : सात कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्ररिंग केल्याचे सांगत सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून १२ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (12 lakhs cheated by pretending to be a CBI officer in Nashik, Iagatpuri)
रामप्रताप रामदेव यादव (७६, रा. धम्मगिरी, इगतपुरी) यांच्या फिर्यादीनुसार संशयित विजय खन्ना नामक व्यक्तीने यादव यांना २८ ते ३० ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या दोन क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल करत सीबीआयमधून पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगत तुम्ही नरेश गोयल यांच्यासोबत मिळून 7 कोटींचे मनी लॉन्ड्ररिंग केल्याने तुमच्याविरुद्ध कॅनरा बँकेत मनी लॉन्ड्ररिंगची केस दाखल असल्याचे सांगितले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर तुमचे कुटुंबाला त्रास होईल. त्यामुळे तुम्हाला केसमध्ये मदत करून यामधून बाहेर काढण्यासाठी एसबीआयच्या गुरगाव शाखेतील बँक खात्यात १२ लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार यादव यांनी कुटुंबाला त्रास होईल या भीतीपोटी १२ लाख रुपये टाकले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे समजताच यांनी इगतपुरी ठाणे गाठून फिर्याद दिल्याने संशयित विजय खन्ना, राहुल गुप्ता, रेखा (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा झाला आहे. पोलिस निरीक्षक राहुल तसरे अधिक तपास करीत आहेत.