नाशिक : पिंपळगाव बहुला येथील डाकघर शाखेत डाकपाल असलेल्या संशयिताने २९ लाख १० हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्राहकांच्या बचत खात्यांमधील लाखो रुपयांची रक्कम डाकपाल योगेश भगवान तिवडे (रा. पिंपळगाव बहुला) याने घेत गंडा घातल्याचे समारे आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
मनीष राजाराम देवरे (रा. पार्कसाइड होम्स, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, डाक विभागाच्या पिंपळगाव बहुला शाखेत संशयित तिवडे हा डाकपाल म्हणून २०१९ पासून ऑगस्ट २०२३ या दरम्यान कार्यरत होता. या शाखेतील बचत खातेदारांकडून त्याने बचतीची रक्कम जमा करताना घोटाळा केला. त्याने खातेदाराची रक्कम जमा केल्याची नोंद खाते पुस्तकावर केली. मात्र, पैसे बचत खात्यात जमा न करता स्वत:कडे ठेवत त्याचा अपहार केला. अशा पद्धतीने त्याने २०१९ ते २०२३ या दरम्यान लाखो रुपयांचा अपहार केल्याचे समारे आले. डाक विभागाचा आर्थिक ताळेबंद सुरू असताना हा प्रकार लक्षात आला. यासंदर्भात डाक विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल नळकांडे तपास करीत आहेत.