नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावे बनावट पावती पुस्तके तयार करून त्यातून ८९ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक केली. एप्रिल महिन्यात दाखल या गुन्ह्याच्या तपासात काळे यांचाही सहभाग आढळल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. या घोटाळ्यात अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काळे यांना बुधवारी (दि. ३१) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एप्रिल २०२४ मध्ये पंचवटी पोलिस ठाण्यात बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप (५४) यांनी फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार समितीचे तत्कालीन लिपिक सुनील विश्वनाथ जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तत्कालीन सचिव काळे यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला. गैरकारभारातील नोंदी गायब होऊनही सचिवांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे संशयास्पद होते. त्यामुळे काळे यांनाही या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संस्थेचे प्रशासक फयाज मुलाणी यांच्याकडे संशयिताची खातेनिहाय चौकशी झाली. त्यानुसार ११ जुलै २०२२ रोजी संशयित जाधवला बडतर्फ केले होते. या तपासात उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविल्याचे कळते. संशयितांनी संगनमत करून समितीचे आर्थिक नुकसान केल्याचे समोर आले. या गुन्ह्यात इतर संशयितांचीही नावे समोर येणार असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील १९८ शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदीत फसवणूक झाल्याप्रकरणी काळे यांच्याविरुद्ध तक्रारी व दावे दाखल झाले होते. त्यानुसार राज्याचे सहसचिवांनी काळे यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑक्टोबर २०२३ मध्ये काळेंचे निलंबन झाले, तर काळे यांच्या विरोधात अनेक तक्रारी समितीकडे करण्यात आल्याचे समजते.
संशयित सुनील जाधवला १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधीत जकात नाका येथे बाजार शुल्क वसुलीकरिता १३ पावती पुस्तके देण्यात आली होती. त्यापैकी दोन पुस्तकांच्या बाजार शुल्क वसुलीचा भरणा हा संशयिताने संस्थेत केला. मात्र, पावती क्रमांक ७५, ८७, ३०१, ३२३, ३६५, ३६६, ३८९, ४३५, ४४२, ४६९ व ५२९ या पावत्यांचा सुरुवातीस भरणा केला नाही. त्याच क्रमांकाची बनावट पावती पुस्तके छापून त्यामार्फत शुल्कवसुली करीत पैशांचा अपहार केला. शुल्क पावती फाडली न गेल्याचे सांगत कोरी पावती पुस्तके संस्थेत जमा केली. तसेच संशयिताकडे ३०९ क्रमांकाचे पावती पुस्तक दिलेले नसतानाही त्याने पावती पुस्तकाच्या माध्यमातून शुल्कवसुली केल्याचे समोर आले.