

नाशिक : गोरेवाडी, नाशिकरोड येथील खुनाच्या घटनातील संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यापैकी दोन हे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. तर उर्वरित दोघे पोलिस कोठडीत आहेत.
गोरेवाडी भागात जुन्या वादातून एका टोळक्याने कृष्णा दीपक ठाकरे (२४) या युवकाचा धारदार शस्त्राने खून केला होता. या प्रकरणी ज्योती मनोज अहिरे (३२, रा. हिवाळेवाडी, गोरेवाडी) यांनी फिर्याद दिली होती. ज्योती याचा भाऊ कृष्णा व लहान बहिण छाया यांच्यासमवेत दांडिया खेळण्यासाठी गेले असता रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास घरी परतत असताना वाटेत त्यांना संशयित मोइन शेख भेटला. त्याच्यासोबत प्रकाश ऊर्फ असू बारसे व दोन विधिसंघर्षित बालके होते. दोन दिवसांपूर्वी कृष्णा आणि मोइन यांच्यात वाद झाला होता. या वादातून कृष्णा याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याच रात्री संशयितावर ताब्यात घेतले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.