

नाशिक : अंडरवर्ल्डचा अड्डा असलेल्या मुंबई, ठाण्यासारख्या अशांत शहराचा शेजारी जिल्हा असतानाही शांतताप्रिय वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेची पूर्ती ऐशीतैशी झाली आहे. नाशिकला मिळालेली स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न शहराची ओळख पुसली जात असून, 'खुनांचे शहर' म्हणून नवी ओळख नाशिकला मिळतेय की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील नऊ महिन्यांत नाशिकमध्ये तब्बल ४३ खून झाले असून, दर महिन्याची सुरुवातच खुनाच्या घटनेने होत आहे. खुनांच्या एकापाठोपाठ घटना घडत असताना, पोलिस मात्र, हातावर हात ठेवून आहेत. दुसरीकडे सर्वसामान्य नाशिककर मात्र जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी (दि. २) म्हणजेच दसऱ्याला नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीतील गोरेवाडी भागात रात्री ११.१५ ते ११.३० च्या सुमारास जुन्या वादातून एका टोळक्याने २४ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. कृष्णा दीपक ठाकरे असे मृत युवकाचे नाव आहे. ज्योती मनोज अहिरे (३२, रा. मोहन जाधव किराणा दुकानाच्या शेजारी, हिवाळेवाडी, गोरेवाडी, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या मयत भाऊ कृष्णा व लहान बहीण छायासमवेत दांडिया खेळण्यासाठी गेले होते. रात्री ११.१५च्या सुमारास दांडिया खेळून घरी जात असताना वाटेत त्यांना संशयित मोइन शेख भेटला. त्याच्यासोबत प्रकाश ऊर्फ असू बारसे व दोन विधिसंघर्षित बालके होते. दोन दिवसांपूर्वी कृष्णा आणि मोइन यांच्यात वाद झाला होता. यावेळी मोइन कृष्णाला म्हणाला की, आपण दोन दिवसांपूर्वी झालेला वाद बोलून मिटवू. त्यानंतर चारही संशयित कृष्णाला घेऊन जाधववाडीकडे गेले.
त्यावेळी मोइनच्या कमरेला धारदार शस्त्र असल्याचे फिर्यादी ज्योती अहिरे यांना दिसले. त्यांना शंका आल्याने त्या कृष्णाचा मित्र तिलक मेहरूलिया याला घेऊन त्यांच्या पाठीमागे गेले. संतोष जाधव यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या गल्लीत मोइन शेखने मागील भांडणाची कुरापत काढून कृष्णाच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसले. त्याचवेळी प्रकाश व एका विधिसंघर्षित बालकाने त्यांच्याकडील कोयत्याने कृष्णावर वार केले. हे सर्व जण कृष्णाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. हा सर्व प्रकार फिर्यादी ज्योती अहिरे हिने पाहिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रात्रीच सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडत असल्याने नाशिककरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टवाळखोर सर्रासपणे कोयते, तलवारी व अन्य धारदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याने, कोणाला हटकण्याचीदेखील सोय उरली नाही. या टवाळखोरांवर पोलिसांचा अजिबातच वचक नसल्याने, नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पोलिसांनी व राज्यकर्त्यांनी योग्य पावले उचलून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नाशिककर करीत आहेत.
भाऊ रक्ताच्या थारोळ्यात, बहिणीची आरडाओरड
डोळ्यादेखत भाऊ कृष्णाला जीवे मारत असल्याचे पाहताच बहीण ज्योती अहिरेनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व संशयित आरोपी पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात कृष्णा तिथे पडलेला असताना, ज्योतीने तिलकच्या मदतीने त्याला एका रिक्षात बसवून बिटको रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र, तेथे डॉक्टरांनी कृष्णाला तपासून मयत घोषित केले.
गत सप्टेंबरमध्ये ७ खुनाच्या घटना
सप्टेंबर महिन्यात सात खुनाच्या घटना समोर आल्या. यातील बहुतांश खून दिवसाढवळ्या आणि नागरी वसाहतीत झाले. मारेकऱ्यांनी वार करून दहशतही निर्माण केल्याचे दिसून आले. खून केल्यानंतर मारेकरी बिनदिक्कतपणे लोकांना धमकावत घटनास्थळावरून पसार झाले. जणू काही पोलिसांचा धाकच नसल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून आल्याने, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
विधिसंघर्षित बालकांचा समावेश
४३ पैकी बहुतांश खुनाच्या घटनांमध्ये विधिसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. सराईतांकडून बालकांचा हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये खुबीने वापर करीत आहेत. या बालकांवर कारवाई करताना पोलिसांनादेखील मर्यादा येत आहेत. हत्येच्या गुन्ह्यांमध्ये विधिसंघर्षितांचा वापर करण्याचा ट्रेंडच निर्माण झाला आहे.
पालक नेत्यांच्या नुसत्याच बाता
नाशिकचे पालक नेते म्हणून समोर येत असलेल्या नेत्यांकडून कायदा-सुव्यवस्थेच्या नुसत्याच बाता मारल्या जात आहेत. नाशिकचे पालकमंत्री राहिलेले अन् कुंभमेळा मंत्री असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकवर विशेष लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जाते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी झाली असताना, महाजन अॅक्शन मोडवर केव्हा येणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आमदारांच्या भेटीनंतरही खूनसत्र
आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले या सत्ताधारी भाजपच्या तिन्ही आमदारांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नुकतीच भेट घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा केली. मात्र, त्यानंतरही शहरात खूनसत्र सुरूच असून, आमदारांची भेट नक्की कशासाठी असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
हटकले तरी, जीव जाण्याची भीती
टवाळखोर सर्रासपणे धारदार शस्त्र घेऊन फिरत असून, त्यांना कोणी हटकण्याचे धाडस केल्यास जीव जाण्याची अधिक शक्यता आहे. वाहनांची तोडफोड असो की, दहशत पसरविणे असो सध्या शहरात या टवाळखोरांचीच दहशत दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस अॅक्शन मोडवर केव्हा येणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.