नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात १९५२ ते २०२४ या ७२ वर्षांच्या कालावधीपैकी सुमारे ३५ वर्षे खासदारकीच्या माध्यमातून शहराचे दिल्लीतील नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र १९९९ पासून नाशिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा खासदार होऊ शकलेला नाही. एकेकाळी सर्वाधिक कालावधी लोकसभा मतदारसंघावर प्राबल्य ठेवलेल्या राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षास गत २५ वर्षांपासून दिल्ली गाठता न आल्याने पक्षाची पीछेहाट ठळकपणे दिसते.
१९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून गोविंद देशपांडे हे विजयी झाले होते. दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर मात्र काँग्रेस पक्षाने सलग १९६२ ते १९७७ या कालावधीतील तीन पंचवार्षिक लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. सहाव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर १९८० ते १९८९ या सातव्या व आठव्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले व त्यांनी दिल्लीत छाप सोडली. त्यानंतर १९९१ ते १९९६ या १० व्या व १९९८ ते १९९९ या १२ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला. यानंतर मात्र काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होऊन दिल्लीत जाऊ शकलेला नाही. यामुळे काँग्रेस पक्षाची शहरावरील पकड सैल झाल्याचे पाहावयास मिळाले. पक्षातील अंतर्गत गटबाजी, लोकप्रतिनिधींची पक्षापेक्षा स्वत:ची छबी जपण्याचे प्रयत्न यामुळे मतदार राजा काँग्रेसपासून दुरावल्याचे चित्र आहे. त्यानंतर राज्यात काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला. त्यानंतर राष्ट्रवादीने २००४ ते २०१४ या कालावधीत सलग दोनदा या मतदारसंघातून विजय मिळवत दिल्ली गाठली. त्यानंतर सलग दोनदा काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार पराभूत झाला आहे. येत्या १८ व्या लोकसभा निवडणुकीतही शहरातून काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवत असल्याने यंदाही काँग्रेस पक्षास उपेक्षा मिळणार आहे. १७ पैकी आठ लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने विजय मिळवूनही पक्षास उमेदवारीवरील दावादेखील करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यात पक्षाकडे स्थानिक नेतृत्व नसणे, पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकी नसणे या महत्त्वाच्या कारणांसह मतदारांपर्यंत पाेहोचण्यात पदाधिकारी कमी पडत असल्याचे कारणे आहेत.
अंतर्गत गटबाजीचा फटका
पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळेही पक्षाला गतवैभव मिळत नसल्याचे चित्र आहे. इतर पक्षांसोबत युती केल्याने काँग्रेस पक्षास लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यास संधी मिळत नसल्याने भविष्यात पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जोमाने मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षाचा मतदार बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र सद्यस्थितीत 'मनी, मसल, मास' या 'ट्रिपल एम' फॅक्टरच्या अभावामुळे तरी हे शक्य नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा :