Nashik CNG Pump| सीएनजी पंपांवरील रांगा कमी होणार!

Nashik CNG Pump| सिंहस्थ पार्श्वभूमीवर आवश्यक पुरवठ्यासह पंपिंग युनिट वाढवण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
नाशिक
वाहनांमध्ये सीएनजी भरण्यासाठी रांगा लावण्याचा मनस्ताप वाहनधारकांना असह्य होत आहे(छाया : हेमंत घोरपडे )
Published on
Updated on

नाशिक : नामदेव भोर

नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे! शहरासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या तुटवड्यामुळे वाहनचालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह एमएनजीएलसह अन्य इंधन पुरवठादार कंपन्यांशी समन्वय साधून नाशिकमध्ये पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

नाशिक
Chhatrapati Sambhajinagar Smart City Projects : स्मार्ट सिटीच्या अपूर्ण प्रकल्पांच्या ३५ कोटींचा महापालिकेवर भार

विशेष म्हणजे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सीएनजी केंद्रांवर इंधनाचा नियमित पुरवठा राहावा, वाहनचालकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये आणि रांगा कमी व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सीएनजी पुरवठ्याचा दररोज आढावा घेण्याचे तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच सीएनजीची उपलब्धता सुधारेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय उपलब्ध झाल्याने नाशिककरांनी सीएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांना पसंती दिली. परिणामी, सीएनजी वाहनांच्या संख्येत झालेली वाढ आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांना सीएनजीचा पुरवठा करण्यास शहरासह जिल्ह्यातील सीएनजी पुरवठा यंत्रणा अपुरी पडत असल्याने सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी प्रशासन अलर्ट झाले आहे.

नाशिक
Pimpri Chinchwad Disaster Management: पिंपरी-चिंचवड शहर आपत्ती व्यवस्थापनात किती सक्षम? वाढत्या उंच इमारतींमुळे आव्हाने वाढली

सिंहस्थात सुमारे ८ ते १० कोटींहून अधिक भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेलसह सीएनजीचा आवश्यक साठा उपलब्ध करून देण्यासोबतच सीएनजी युनिट वाढवण्यासाठी व थेट पाइपलाइनद्वारे सीएनजी पुरवठा सुरू करण्यासाठी इंधन कंपन्यांसोबत समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केल्या आहेत.

जिल्ह्यात ऑनलाइन ८, तर ऑफलाइन १५ असे सुमारे २३ सीएनजी पंप आहेत. यापैकी पुरवठ्याची अडचण निर्माण झाल्यास सर्वाधिक परिणाम ऑफलाइन पंपांवर होतो. विल्होळी येथील पंप बंद असल्याने उर्वरित सात ऑनलाइन पंपांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. अनेक वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी एक ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे. विशेषतः रिक्षाचालक, टॅक्सीचालक, शालेय वाहतूक करणारे चालक तसेच सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनधारकांचे दैनंदिन नियोजन विस्कळीत झाले आहे.

नाशिक
Animal Husbandry Online Data Entry | पशुसंवर्धनातील डिजिटल अडथळे

नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच मागणीच्या तुलनेत पुरवठा होऊ शकलेला नाही. नाशिकमधील पहिला पंप असूनही आम्हाला पाच वर्षांपासून अद्यापिही पुरेसा पुरवठा होऊ शकलेला नाही. आम्ही दिवसाला ६ हजार किलोपर्यंत विक्री करू शकतो. परंतु, पुरवठा केवळ १५०० ते २००० किलोपर्यंत होते. त्यामुळे ग्राहकांचा प्रतीक्षा कालावधी वाढत असल्याने ग्राहकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. सिंहस्थ कालावधीत ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.

- मुकुंद आढाव , आढाव पेट्रोलियम

सिंहस्थ पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वाहने जिल्ह्यात येणार आहेत. या वाहनांना इंधनाची टंचाई भासू नये, यासाठी सद्यस्थितीचा आढावा घेण्यासोबतच इंधन कंपन्यांसोबत समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार पेट्रोलपंप व सीएनजीची युनिट वाढवण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- आयुष प्रसाद , जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news