

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीसाठी रविवारी (दि.४) संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे सोमवारी (दि.५) देखील शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
सातपूर विभागातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, पंचवटी व नाशिकरोड या विभागांना पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिमी व्यासाच्या कच्च्या पाण्याच्या जलवाहिनीला मुक्त विद्यापीठ गेटजवळ गळती सुरू झाली आहे.
तातडीची बाब व अत्यावश्यक बाब म्हणून जलवाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले जाणार आहे. रविवारी (दि. ४) सकाळी ११ पासून काम सुरू करण्यात येणार आहे. काम मोठ्या स्वरुपाचे असल्याने कामास आठ ते दहा तास लागणार आहेत.
त्यामुळे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिकरोड व सिडको विभागातील पवननगर जलकुंभावरून वितरण होणाऱ्या या भागात रविवारी दुपारचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सोमवारी (दि. ५) पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे