

नाशिक : पावसामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्यानंतर आता या रस्ते दुरुस्तीचा 'मेगा कार्यक्रम' महापालिकेमार्फत हाती घेतला जाणार आहे. शहरातील विविध भागांमधील रस्ते दुरुस्तीसह खडीकरण, डांबरीकरण व कॉंक्रिटीकरणासाठी तब्बल १२५ कोटींच्या ३७ प्रस्तावांना महासभेने मंजुरी दिली आहे.
यंदा मे महिन्यांपासूनच पावसाला सुरूवात झाल्याने पावसाळापूर्व कामांना मुहूर्त मिळाला नव्हता. पावसाने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. खड्डेमय रस्त्यांमुळे लहानमोठ्या अपघातांना सामोरे जावे लागल्याने नागरिकांकडून महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला गेला. नागरिकांच्या संतापाचा फटका महापालिका निवडणुकीत नको म्हणून राज्यातील सत्ताधारी विशेषत: कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला शहरातील रस्ते दुरुस्तीचे निर्देश दिले. त्यानुसार मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेत प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमत बहुतांश रस्त्यांतील खड्डे बुजवले. असे असले तरी अजुनही अनेक रस्त्यांची दुरुस्ती मात्र कायम आहे.
महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. असे असताना खड्डे महापालिकेची पाठ सोडत नाही. यामुळे आता पावसाची उघडीप झाल्यानंतर मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे तसेच दुरुस्ती हाती घेण्याच्या दृष्टीने तब्बल १२० कोटी रुपयांचे ३७ प्रस्ताव महासभेकडे मान्यतेसाठी सादर केले होते. त्यास मान्यता देण्यात आली आहे. यातील अनेक कामे ही गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीची आहेत. विविध केबल कनेक्शन, पाइपलाइन यासाठी रस्ते खोदकाम करणाऱ्या संस्था तसेच कंपन्यांकडून रोड डॅमेज चार्जेस भरून घेतले जातात. त्यानुसार एमएनजीएल कंपनीकडूनही मनपा खजिन्यात रिस्टोरेशन चार्जेस भरून घेण्यात आले होते. या रक्कमेतील शिल्लक व बचत झालेल्या रक्कमेतूनही अनेक रस्त्यांची कामे केली जात आहेत.
गॅस पाइपलाइन टाकल्यानंतर दुरुस्ती करावयाच्या रस्ते कामासाठी प्राकलन दरापेक्षा मंजूर निविदा कमी दराने प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बचत झालेल्या रक्कमेतून तसेच अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या निधीतून रस्ते दुरुस्ती, खडीकरण, डांबरीकरणाची कामे प्रस्तावित केली आहेत.
संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका. नाशिक.
या प्रभागांत होणार रस्ते दुरुस्ती
पंचवटी विभागातील प्रभाग क्र. १, २, ३, ४, ५ व ६ तसेच पश्चिम विभागातील प्रभाग क्र. ७, १२ व १३, पूर्व विभागातील प्रभाग क्र. १५, १६, २३, ३० नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. १९, २०, २१, २२, नवीन नाशिक विभागातील २४, २५, २८, ३१, सातपूर विभागातील प्रभाग क्र. ८, ९, १०, ११, २६ मधील रस्ते दुरुस्ती तसेच खडीकरण व डांबरीकरण करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.