Nashik Smart City News | बेकायदा रस्ते खोदल्याने स्मार्ट कंपनीला नोटीस

Nashik Smart City News | नियम मोडल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाची कारवाई
Nashik Smart City
Nashik Smart City file photo
Published on
Updated on

नाशिक : पावसाळ्यात रस्ते खोदाईला बंदी असताना नवीन सिग्नलसाठी वीज कनेक्शन तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामासाठी विनापरवानगी रस्ते खोदल्याप्रकरणी स्मार्ट सिटी कंपनीला महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएल कंपनीमार्फत घरगुती गॅस पाईपलाईनचे काम असो, बीएसएनएलसह विविध मोबाईल कंपन्यांच्या आॉप्टीकल फायबर केबल असो वा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे गेल्या चार वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या खोदाईचा प्रश्न नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. नागरिकांच्या कररूपी निधीतून तयार करण्यात आलेले शेकडो कोटींचे रस्ते खोदले जात असल्यामुळे प्रामुख्याने पावसाळ्यात रस्त्यांची दैना नागरिकांसाठी जणू अडथळ्यांची शर्यत बनली आहे. पादचारी तसेच वाहनधारकांना या खड्ड्यांमुळे लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देताना १ जुन पासून शहरातील रस्ते खोदाईवर बंदी घालण्यात आली होती. मात्र स्मार्ट सिटी कंपनीने ही बंदी झुगारून लावली आहे. भर पावसात शहरातील ४५ सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम स्मार्ट कंपनीमार्फत सुरू केले आहे. त्यासाठी चौकाचौकांमध्ये रस्ते खोदले जात आहेत. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. स्मार्ट सिटीच्या या गलथान कारभाराचा फटका मात्र बांधकाम विभागासह शहरातील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने बंदी झुगारणाऱ्या स्मार्ट कंपनीला नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे.

विनापरवाना रस्ते खोदाई

वीज कनेक्शन, नळ कनेक्शनसाठी रस्ते फोडण्याच्या परवानगी करिता सर्वसामान्य नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. स्मार्ट सिटी कंपनीने मात्र महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता नवीन सिग्नल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केबल टाकणे यासारख्या कामांसाठी रस्ते खोदाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे रस्ते खोदताना जुने सिग्नलही कायम ठेवण्यात आल्याने नव्या व जुन्या सिग्नलपैकी नेमका कोणत्या सिग्नलचे पालन करायचे असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. शहरातील सह्याद्री हॉस्पीटल लगतच्या चौकात हा प्रकार सर्रास घडत आहे.

पावसाळ्यात सर्व कामांसाठी रस्ते खोदाईस बंदी घालण्यात आली आहे. मात्र स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता रस्ते खोदकाम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news