

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आखाती देशांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील किती नागरिक किंवा विद्यार्थी त्या देशात आहेत, त्याची माहिती घेण्याचे काम युदद्धपातळीवर सुरू झाले आहे. प्रशासनातर्फे पर्यटक ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत संपर्क साधून खातरजमा केली जात आहे.
मंगळवारी सायंकाळपर्यंत मालेगाव येथील सुमारे ७०० भाविक मक्का मदिना येथे तर जिल्ह्यातील ३२ जण इतर आखाती देशांत अडकले असून, त्यात १२ विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. आखाती देशातील अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीत महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांमधील नागरिक व पर्यटक अडकल्यांची माहिती पुढे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासन माहिती घेत मदतीसाठीचे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. परदेशात विशेष करून गल्फ देशात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने सूचना केल्या आहेत.
सुरक्षित ठिकाणी राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात, भारतीय दूतावास/कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, आपले ठिकाण व स्थितीची माहिती कुटुंबीय किंवा प्रशासनाला द्यावी, मोबाइल चार्ज ठेवताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत, सोशल मीडियावर अफवा, अप्रामाणित संदेश पसरवू नये, दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासनकडून तातडीचे पावले उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नाशिकमधील कोणी नागरिक अथवा पर्यटक संबंधित देशात अडकले आहेत का, याची चाचपणी करण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे जिल्ह्यातील जवळपास सर्वच टूर्स ऑपरेटर्स व ट्रॅव्हल कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. तसेच विविध माध्यमातून माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यामध्ये सायंकाळपर्यंत साधारणतः ३० नागरिक अडकून पडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. परंतु या व्यक्ती कोठे अडकल्या आहेत याची नेमकी माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांगितले.
संबंधितांची माहिती संकलित करण्यास सुरुवात
भारत-इस्रायल-इराण या देशांदरम्यान सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील सुमारे ७०० नागरिक सध्या मक्का मदिना येथे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित नागरिकांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. मालेगावचे अपर तहसीलदार ज्योती देवरे व मंडल अधिकारी यांनी शहरातील ट्रॅव्हल एजन्सी कार्यालयात प्रत्यक्ष बसून पासपोर्ट क्रमांक, सध्याचे ठिकाण, मोबाइल क्रमांक आदी तपशील संकलित करीत आहेत. प्रशासनाकडून संबंधित कुटुंबीयांशीही संपर्क साधला जात असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.