

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. करारातील अटींची पूर्तता न करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा सिटीलिंक बससेवा बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मनपा स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. सिटीलिंक अंतर्गत वाहतूक नियंत्रक आणि लाइन चेकिंग अधिकारी म्हणून काम करणारे कर्मचारी 'बॉस सिक्युरिटी सर्व्हिसेस' या कंत्राटदारामार्फत सेवा देत आहेत.
मात्र, २०२१ मध्ये झालेल्या करारातील अनेक अटींची अंमलबजावणी कंत्राटदाराकडून होत नसल्याचा आरोप करण्यात आला. करारानुसार प्रत्येक २० दिवसांच्या कामामागे एक पगारी सुट्टी मिळणे अपेक्षित असताना २०२१ पासून कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळालेली नाही. त्यामुळे प्रलंबित सुट्ट्यांचा आर्थिक फरक तातडीने द्यावा, अशी मागणी केली.
तसेच दरवर्षी दोन गणवेश, शूज, बेल्ट व जॅकेट देण्याची तरतूद असूनही साहित्य न मिळाल्याने करारभंगाचा दंड कंत्राटनू भोर यांच्या कुटुंबाला करारानुसार विमा मदत मिळावी, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढावा, अशी मागणीही बैठकीत केली.
याशिवाय लाइन चेकिंग अधिकाऱ्यांवरील मानसिक दबाव, चालक-वाहकांवरील विनाकारण दंड आणि खराब टॅबच्या समस्यांवरही चर्चा झाली. यावेळी बडगुजर यांनी कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
"कराराचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई झाली पाहिजे. सिटीलिंक कर्मचाऱ्यांचे शोषण सहन केले जाणार नाही. मागण्यांची दखल न घेतल्यास म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली सिटीलिंक कर्मचारी संप पुकारतील."
सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना