

Mumbai Agra highway incident
सिडको : येथील मुंबई–आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा समोरील उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ बसला अचानक भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
एमएच १५ जेसी ५५१२ क्रमांकाची नंदुरबार डेपोची लाल परी बस नाशिककडून पाथर्डीफाटा मार्गे आयशर शो रूम कडे दुरुस्ती साठी घेऊन जात असताना पाथर्डी फाटा परिसरात उड्डानपुलावर अचानक बसच्या इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर व आग लागल्याचे दिसून आले. आग लागल्याचे लक्षात येताच चालक डी. एन. न्यादडे व वाहक वाघ त्वरीत बस मधून उतरले. बसने वेगाने पेट घेतला. या आगीमुळे उड्डाणपुलावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. दरम्यान, अग्निशमन विभागाचे हर्षद पटेल, पी. जी. लहांगे, आय. आय. काजी, सुनील ढगे, के. के. पवार आदी जवानांनी दोन बंबांच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.
अग्निशमन दलाच्या त्वरित कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. सदर बसी नंदुरबार आगाराची होती आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.