

सिडको (नाशिक) : पवननगर परिसरात भर रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चांगलीच खबर घेतली. वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच अंबड पोलिसांच्या नजरेत ही घटना आली आणि सर्वांना पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले.
गुरुवार, ४ डिसेंबरला सात ते आठ जणांच्या टोळक्याने रस्त्यावर टेबल लावून चार-पाच केक कापत मोठ्या आवाजात हुल्लडबाजी केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रकारामुळे रहिवाशांना त्रास होत होता, मात्र कोणीही वाद नको म्हणून पुढे आले नाही. या हुल्लडबाज तरुणांनी या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल केल्याने सर्वत्र हा व्हिडीओ परिसरात फिरत होता.
व्हिडिओ पाहून पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून माफीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला, ज्यात त्यांनी भविष्यात रस्त्यावर वाढदिवस साजरा न करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी काढलेल्या या व्हिडिओचीही परिसरात चर्चा रंगली.
सर्वसामान्यांना त्रास होईल असे प्रकार कोणीही करू नयेत. रस्त्यावर दहशत माजवित वाढदिवस साजरा करणाऱ्या 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढे असे प्रकार केल्यास कठोर कारवाई होईल.
जग्वेंद्रसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे