

सिडको (नाशिक) : अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्यांचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन स्वतंत्र एमआयडीसी पोलिस ठाण्याची निर्मितीसाठी आमदार सीमा हिरे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे. गृहविभागाने मंगळवारी स्वतंत्र एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. शासनाने सदर पोलिस ठाण्यासाठी १८१ अधिकारी, कर्मचारी पदांना मान्यता दिली आहे. या पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी गेल्या दोन वर्षांपासून दैनिक पुढारीने विविध बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.
पश्चिम विधानसभा मतदारसंघात अंबड आणि सातपूर अशा दोन मोठ्या औद्यागिक वसाहती आहेत. आजमितीस अंबड, सातपूर हे दोन मोठे पोलिस ठाणे कार्यरत असून, या पोलिस ठाण्यांवरील कार्यभार कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एमआयडीसी पोलिस चौकी कार्यरत केलेली आहे. या चौकीवर सक्षम पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करून चौकीला तात्पुरते पोलिस ठाण्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. या चौकीच्या ठिकाणी पोलिस ठाण्याची उभारणी करण्याची मागणी उद्योजकांसह नागरिकांनी केली होती. याविषयीचा पोलिस आयुक्तांकडून राज्य शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे.
पोलिस ठाण्यासाठी आ. हिरेंनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पोलिस ठाण्याच्या मान्यतेसाठी विशेष पत्र दिले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडूनही गृहविभागाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
अंबड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती होणार आहे. यासाठी बांधकाम निधी तसेच आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळही शासनाकडून उपलब्ध होणार आहे. सिडको आणि परिसरातील गुन्हेगारीत निश्चितच मोठी घट होणार आहे.
आ. सीमा हिरे, पश्चिम विधानसभा मतदारसंघ, नाशिक.