

नाशिक : कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या छोटू वडापावच्या दुकानात बुधवारी (दि. 10) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. क्षणातच आगीने रौद्रावतार धारण केला. आगीच्या ज्वाला इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने चार ते पाच दुकानांना हानी पोहचली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
शिंगाडा तलाव येथून जवानांची कुमक दाखल
कॉलेज रोडवरील हरी निवास हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यात असलेल्या छोटू वडापाव दुकानामध्ये जोराचा आवाज होऊन आगीच्या ज्वाला भडकल्या. यावेळी या दुकानासह त्याच्या शेजारी असलेली पाचही दुकाने बंद होती. बुधवारी (दि. 10) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. अवघ्या काही मिनिटात आगीने रौद्ररूप धारण केले आणि या दुकानाच्या शेजारी असलेल्या दुकानांना देखील आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तीन दुकाने पूर्णत: बेचिराख झाली आहे. घटनेची माहीती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातून पहिला बंब वेगाने घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाला. त्यापाठोपाठ दुसरा मेगाबाउजर बंबासह जवानांची कुमक दाखल झाली होती. सातपूर उप केंद्राचा मेगा बाऊजर बंबासह जवान दाखल झाले. तीन बंबाच्या सह्याने आग विझविण्यास जवानांना यश आले आहे.
या दुकानांनाही आगीची झळ
या दुर्घटनेत छोटू वडापाव, कॅफे एक्सप्रेस, कॅम्पस चॉईस, अकबर सोडा ही एका रांगेत असलेली दुकाने बेचिराख झाली आहेत. पहिल्या मजल्यावर हेअर ट्रान्सप्लांट आणि ट्रीटमेंटचे क्लीनिकसुद्धा जळाले आहे. गंगापूर पोलिसांनीही घटनास्थळी दाखल झाले होते. तर कुलकर्णी चौकाकडून येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समोर आले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.