

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अशोकस्तंभ परिसरातील मानाचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी जात असल्याचे सांगून दुकानातून बाहेर पडलेले औषध व्यावसायिक मुकेश गोवर्धनदास ओबेराय (४६, रा. समर्थनगर) यांचा ठाणे येथील खाडी परिसरात मृतदेह आढळला. गुरुवार (दि. १७) पासून बेपत्ता असलेल्या ओबेराय यांच्या अपहरणाची तक्रार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
शनिवारी (दि. १९) उशिरा त्यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच शहरातील औषध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मुकेश ओबेराय हे गोळे कॉलनी परिसरातील त्यांच्या औषध दुकानात आले होते. काही वेळ दुकानात थांबल्यानंतर त्यांनी कर्मचारी आदित्य पाटेकर याला अशोकस्तंभावरील मानाचा राजा गणपतीचे दर्शन घेऊन १० मिनिटांत परत येतो, असे सांगितले.
त्यानंतर ते दुकानातून बाहेर पडले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते दुकानात परतले नाहीत. तसेच घरीही पोहोचले नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे दोन्ही मोबाईल बंद असल्याचे आढळले. कुटुंबीय आणि नातेवाटकांनी विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतरही ओबेराय यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यांचे बंधू मनीष ओबेराय यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मोबाईल लोकेशन आणि संभाव्य प्रवासाच्या मार्गांची तांत्रिक माहितीही तपासली. या तपासात ओबेराय यांचे लोकेशन ठाण्याच्या दिशेने आढळल्यानंतर सरकारवाडा पोलिसांचे पथक तातडीने ठाण्याला रवाना झाले.
ठाणे खाडी परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नातेवाटकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया करण्यात आली. मृतदेह मुकेश ओबेराय यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ओबेराय यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून आजारपणाची समस्या असल्याची माहिती समोर आली आहे. घरातील जबाबदाऱ्या, वैद्यकीय उपचारांचा ताण आणि त्यातून निर्माण झालेली चिंता यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे गाठून खाडीत उडी घेत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ठाणे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. ओबेराय यांनी नाशिक सोडल्यानंतर ठाण्यापर्यंत केलेला प्रवास, त्यांची मानसिक अवस्था आणि मृत्यूमागील नेमके कारण याबाबत सरकारवाडा व ठाणे पोलिसांकडून तपास केला जात आहे.