

नाशिक: त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल जवळ ता ३ नोव्हेंबर रोजी रात्री एक कार अचानक पेट घेतल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका मारुती कंपनीच्या कारने अचानक पेट घेतला. एमएच ४१ वाय ४४३७ या क्रमांकाच्या कारला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अचानक झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. नाशिक शहरातील एबीबी सर्कल हा प्रमुख मार्ग असून, येथून एमआयडीसी परिसर व त्र्यंबककडे जाणारी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावरील एक बाजू काही काळासाठी बंद करण्यात आली व परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
स्थानिक युवकांनी तत्काळ मदत करत पेट घेतलेल्या कारमधील आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. नंतर फायर ब्रिगेडला कळविण्यात आले. फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी वाहनचालकांमध्ये मात्र काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.