नाशिक : आगामी वर्षासाठी नाशिक शहरातील नागरिकांना पिण्याकरिता धरणांमध्ये तब्बल ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता गतवर्षीच्या तुलनेत यंदा २०० दशलक्ष घनफूट अतिरीक्त पाण्याची मागणी महापालिकेने केली आहे.
नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने गंगापूर व मुकणे धरणातून थेट पाइपलाइन योजना राबविली असून दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यांतून पाणी उपसा केला जातो. गतवर्षी नाशिककरांना पिण्यासाठी महापालिकेने गंगापूर धरणातून ४५०० दशलक्ष घनफूट, मुकणेतून १५०० दशलक्ष घनफूट तर दारणेतून २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली होती. जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाने कोणतेही आढेवेढे न घेता नाशिक शहराची तहान भागविली.
यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने तसेच जुनपासून नियमित पावसाला सुरुवात झाल्याने एरवी जून-जुलैत भासणारी पाणीटंचाई यंदा फारशी जाणवली नाही. दरवर्षी १५ आॉक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत धरणांचा आढावा घेतला जाऊन महापालिका, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, एमआयडीसीसह विविध गावांसाठी पाणी आरक्षण निश्चित केले जात असते. तत्पूर्वी संबंधित यंत्रणांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाणी आरक्षणाची मागणी लेखी स्वरुपात नोंदवावी लागते. महापालिकेच्या पाणी वितरण विभागाकडून यांत्रिकी विभाग व यांत्रिकी विभागाकडून आयुक्तांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही मागणी नोंदविली जाते; यंदा अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासन पंचनाम्यात व्यस्त असल्याने पाणी आरक्षणाची प्रक्रिया लांबली. महापालिकेने ६४०० दलघफू पाणीआरक्षणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
यंदा २०० दशलक्ष जादा आरक्षण मागणी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा २०० दशलक्ष जादा पाणीआरक्षण मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविण्यात आली आहे. गंगापूर धरणातून ४६०० दशलक्ष घनफूट, मुकणेतून १६०० दशलक्ष घनफूट तर दारणेतून २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागणी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागामार्फत आयुक्तांच्या मान्यतेने हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
अशी आहे पाणीआरक्षण मागणी (दलघफू)
गंगापूर धरण समूह- ४६००
मुकणे- १६००
दारणा- २००