

ठळक मुद्दे
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे शंभर प्लसचे उद्दिष्ट
इतर पक्षातून आलेली आयात भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आली अंगलट
मुंबई दरबारी 'फिल्डींग' साठी पोहोचलेल्या पदाधिकाऱ्यांची 'बार' मध्ये पार्टी
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांची 'झिंगाट' मुंबईवारी सध्या चर्चेत आली आहे. उमेदवारीकरीता ‘फिल्डींग’ लावण्यासाठी मुंबई दरबारी पोहोचलेल्या या पदाधिकाऱ्यांनी 'बार'मध्ये पार्टी करत स्वपक्षाच्या नेत्याबद्दल उधळलेल्या मुक्ताफळाची क्लिप दुसऱ्या दिवशी थेट पक्षाच्या नेत्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे उमेदवारी तर सोडाच पण पक्षातून हकालपट्टीच्या कारवाईची वेळ या पदाधिकाऱ्यांवर ओढावली. अखेर पक्षाकडे माफीनामा सादर केल्यानंतर कारवाई टळू शकली.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. आगामी निवडणुकीत शंभर प्लसचा नाराच भाजप नेत्यांनी दिला आहे. त्यासाठी विरोधी पक्षात एकही वजनदार पदाधिकारी, निवडून येण्याची क्षमता असलेला इच्छूक ठेवायचा नाही, असा जणू चंगच भाजप नेत्यांनी बांधला आहे. मात्र यामुळे भाजपातील निष्ठावंतांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी थेट मुंबईत जाऊन नेत्यांची दारं ठोठावण्याची वेळ मुळ भाजपेयींवर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन माजी नगरसेवक आणि दोन पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी नाशिकचा कारभार बघत असलेल्या नेत्याला गळ घालण्यासाठी मुंबई गाठली. परंतु नेत्याची भेट होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी भेटायला या असा निरोप मिळाल्यानंतर या चौघांनी नाशिकमध्ये परतण्याऐवजी मुंबईतच थांबून रात्र काढण्याचा निर्णय घेतला.
जिवाची मुंबई करण्यासाठी चौघांनी बार गाठला. मद्याचे घोट रिचवत असताना ज्या नेत्याच्या भेटीसाठी मुंबई गाठली त्याच नेत्यावर अद्वातद्वा बोलणे सुरू झाले. ही चर्चा सुरू असताना त्या नेत्याचा एक कार्यकर्ता सर्व संभाषण मोबाईलमध्ये चित्रीत करत होता, याची जराशी देखील चुणूक या चौकडीला नव्हती. दुसऱ्या दिवशी ही व्हिडीओ क्लिप थेट नेत्यापर्यंत पाहोचली. त्यामुळे नेत्याचा पार चांगलाच चढला. चौघांना पाचारण करत चांगलीच खरडपट्टी काढली गेली. त्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आल्याने चौघांची पाचावर धारण बसली.
दुसऱ्या दिवशी झिंग उतरल्यानंतर घडलेला प्रकार समजल्यानंतर या चौकडीचे धाबे दणाणले. नाशिकमध्ये पक्ष कार्यालयात हजर होवून हातापाया जोडत आम्ही ते नव्हेच अशी भूमिका त्यांनी घेतली. यापुढे अशी चूक होणार नसल्याचा माफीनामा देवून उमेदवारी नको पण हकालपट्टी टाळा अशी आर्जव नेत्यांपुढे केली गेली. त्यामुळे पक्षांतर्गत वाद बाहेर जायला नको म्हणून पक्षाने देखील कारवाई मागे घेतली. मात्र चौघांचे बिंग अखेर फुटलेच.