BJP Incoming Nashik | नव्या पक्षप्रवेशामुळे भाजपत अस्वस्थता

तिकीट कट होण्याच्या भीतीने निष्ठावंत सैरभैर
BJP Mega Entry in Nashik
BJP Mega Entry in Nashik Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नव्या पक्षप्रवेशामुळे भाजपतील निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्याविरोधात पक्षाची धुरा निष्ठेने वाहिल्यानंतर त्यांनाच पक्षात पायघड्या घातल्या गेल्याने कार्यकर्ते सैरभैर बनले असून, महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये तिकीट कट होण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मैदान मारत विरोधकांना धूळ चारली. नाशिक शहरातील तीनही मतदारसंघांत भाजपने पुन्हा विजयश्री खेचून आणली. मात्र, यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. यासाठी त्यांना विरोधी पक्षाच्या उमेदवारांशी वैरही पत्करावे लागले. प्रसंगी अनेकांनी गुन्हेही अंगावर घेतले. त्यामुळे भाजपच्या या विजयात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वाटा निश्चितच मोठा होता. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'शंभर प्लस'चा नारा दिला आहे. ही घोषणा सत्यात उतरविण्यासाठी विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याचा सपाटा भाजप नेत्यांनी लावला आहे. शिवसेना (उबाठा)चे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदाराचा विरोध असूनही बडगुजर यांना प्रवेश दिला गेला. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, या अस्वस्थतेचे गटबाजीत रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केले, आमच्या प्रभागात चांगला लीड दिला, मात्र ज्यांनी विरोधात काम केले त्यांना तिकीट मिळणार असेल तर आम्ही काय करायचे, असा सवाल भाजपतील निष्ठावंतांकडून केला जात आहे.

आमदारांमध्येही नाराजीचा सूर

बडगुजर यांच्या प्रवेशामुळे आमदारांमध्येही नाराजीचा सूर आहे. विशेषत: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांचा विरोध कायम आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडगुजर यांचा प्रवेश सुकर केल्यानंतर दाद मागावी कुणाकडे, असा प्रश्न आमदारांसह कार्यकर्त्यांना पडला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. प्रवेश दिला म्हणजे मोठी जबाबदारी दिली असे नाही. मात्र, कार्यकर्त्यांची अस्वस्थता वरिष्ठापर्यंत पोहोचवली असून, लवकरच या संदर्भात योग्य तो निर्णय अपेक्षित आहे.

सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news