

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील मिनी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कर्मचारी अपुरे असल्याने उपचार व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जिल्हा रुग्णालयानंतर महत्त्वाचे मानले जाणारे हे रुग्णालय नाशिक महानगरासह त्र्यंबकेश्वर, निफाड, इगतपुरी, नांदगाव, मनमाड आदी भागांतील रुग्णांसाठी आधारवड ठरते. त्यामुळे येथे दिवसभर मोठी गर्दी असते.
सकाळच्या ओपीडीमध्ये रुग्णसंख्या प्रचंड असताना डॉक्टरांची काही प्रमाणात व्यवस्था असली तरी आंतररुग्ण सेवेत मोठी तूट जाणवते. सध्या रुग्णालयात केवळ २५ वॉर्डबॉय आणि २१ महिला सेविका कार्यरत असून, ही संख्या अत्यंत अपुरी आहे. परिचारिकांचीही कमतरता असल्याने रुग्णसेवेवर ताण वाढला आहे.
परिणामी, वेळेवर उपचार न मिळणे, स्वच्छतेचा अभाव, तसेच काही रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्याची वेळ येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही गंभीर रुग्णांना याचा फटका बसल्याचेही सांगितले जाते. सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त डॉक्टर, किमान २० परिचारिका, १५ वॉर्डबॉय आणि १५ महिला सेविका तातडीने नियुक्त करण्याची गरज आहे.
सुट्या व गैरहजेरीमुळे अनेकदा वॉर्डमध्ये आवश्यक कर्मचारीच उपलब्ध नसतात, ही परिस्थिती आणखी गंभीर ठरत आहे. रुग्णालयासाठी किमान ५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज स्पष्ट असतानाही केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.
नाशिकमधील हा मनपाचा 66 सर्वात मोठा दवाखाना असूनही मनुष्यबळाअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. आयुक्तांनी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
योगेश गाडेकर, नगरसेवक
सध्या मनुष्यबळ कमी असले तरी १० डॉक्टर व २० परिचारिका वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. वॉर्डबॉयसाठी आउटसोर्सिंगचा विचार सुरू असून, पुढील महिन्यात परिस्थिती सुधारेल. -
डॉ. विजय देवकर, आरोग्य अधिकारी, मनपा नाशिक