नाशिक : जलपर्णीमुळे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षी बिथरले

नाशिक : जलपर्णीमुळे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षी बिथरले
Published on
Updated on

नाशिक : आनंद बोरा
निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षीअभयारण्यात आलेले देशी-विदेशी पाहुणे पक्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परतीच्या मार्गावर निघतात. मात्र, जानेवारीच्या अखेरपासूनच पक्ष्यांनी परतीचा मार्ग धरला असून, त्यास अभयारण्यात वाढलेली जलपर्णी कारणीभूत असल्याचे पक्षिमित्रांकडून बोलले जात आहे. पाटबंधारे, वनविभाग आणि महसूल यांच्यातील समन्वयाअभावी ही परिस्थिती उद्भवली असून, अशीच स्थिती राहिल्यास पुढील वर्षी त्याचा पक्षी आगमनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे १९११ मध्ये बांधलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाला जलपर्णीचा विळखा बघावयास मिळत आहे. गंगापूर धरणातून सोडल्या जाणाऱ्या आवर्तनातून ही जलपर्णी थेट सायखेडा-चांदोरीमार्गे पक्षीअभयारण्यात वाहून येते. यामुळे पक्ष्यांना पाण्यावर मुक्तसंचार करता येत नाही, शिवाय खाद्य मिळणेही अवघड होत आहे. माजी आमदार अनिल कदम यांनी तीन वर्षांपूर्वी पाटबंधारे, वनविभाग आणि महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे सांगितले होते. आमदार दिलीप बनकर यांनीदेखील या प्रश्नावर गेल्या दोन वर्षांपासून भांडत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, त्यात सुधारणा होत नसल्याने त्याचा परिणाम पक्ष्यांच्या वास्तव्यावर होताना दिसून येत आहे. याशिवाय सायखेड्यातील गाेदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या पुलालादेखील जलपर्णींचा धोका निर्माण झाला आहे.

'ट्रॅश स्कीमर'द्वारे स्वच्छता
जलपर्णीची समस्या सोडविण्यासाठी 'ट्रॅश स्कीमर'द्वारे गोदावरीच्या पात्राची स्वच्छता करण्यात यावी, असे मत पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. नाशिक मनपाने स्मार्ट सिटीच्या निधीतून तब्बल एक कोटी ७५ लाख रुपये खर्चून रोबोटिक मशीन खरेदी केले आहे. हे मशीन जमीन आणि पाण्यावर चालणारे असून, या मशीनद्वारे जलपर्णी हटविणे शक्य होऊ शकते.

प्रदूषणाचीही समस्या
नदीच्या किनाऱ्यालगत जमा होणारा कचरा नदीपात्रात पुन्हा मिसळत असल्याने प्रदूषणाचीही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीपात्रांवर व्हर्मी कम्पोस्टिंगचे युनिट्स बसविण्याची गरज आहे. जेणेकरून त्याचे खत होऊन ते शेतीसाठी फायदेशीर ठरेल. या दोन गोष्टींमुळे नदी प्रदूषण शंभर टक्के रोखणे शक्य होईल. नर्मदा नदीचे उगमस्थान असलेल्या अमरकंटकपासून ते होशंगाबादपर्यंत शंभर घाटांवर व्हर्मिकम्पोस्टिंगची युनिट्स बसविले जात आहे. हा प्रयोग याठिकाणी व्हावा, अशी मागणी पक्षिप्रेमींकडून केली जात आहे.

दारणातील पाणवेलीवरून शासनाशी गेल्या दोन वर्षांपासून भांडत आहे. नाशिक महापालिका कुठलीही विनाप्रक्रिया पाणी नदीत सोडत असल्यामुळे, निफाड परिसरात पाणवेलींचा विळखा वाढत आहे. याशिवाय दूषित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी. – दिलीप बनकर, आमदार

नाशिक महापालिकेला वारंवार सांगूनदेखील प्रक्रिया न केलेले पाणी सोडले जात असल्याने, पात्रात प्रदूषणाची समस्या वाढली आहे. महापालिकेने याविषयी गांभीर्याने न घेतल्यास, आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर संबंधित विभागानेदेखील जलपर्णी काढण्याबाबत सतर्कता दाखवावी. – अनिल कदम, माजी आमदार

अभयारण्यात येणाऱ्या पाणवेलींविषयी नाशिक महापालिकेला आम्ही पत्र दिले आहे. पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर त्यासोबत पाणवेली मोठ्या प्रमाणात वाहून येतात. त्याचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर होत आहे. शहरातून दूषित पाणी वाहून येत असल्याचे पाण्याचे नमुने मेरीकडे तपासणीस दिले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मनपाशी पत्रव्यवहार करू. – शेखर देवकर, प्रभारी सहायक वनसंरक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news