

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण येथील शेतकरी यांनी मोठा खर्च करून लावलेले कोबी पीक बोगस बियाण्यामुळे वाया गेले याबाबत शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.
नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण येथील शेतकरी पंढरीनाथ पाळदे, रंगनाथ कुटे, रामदास धुर्जड व संदीप धुर्जड यांनी गरडेश्वर अॅग्रो सेंटरमधून वेलकम सीड्स कंपनीचे डॉलर नावाचे कोबीचे बियाणे खरेदी केले होते.
मात्र हे बियाणे बोगस निघाल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कंपनीच्या नाशिक येथील मॅनेजरने महिन्यापूर्वी शेतात येऊन पाहणी केली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही वा नुकसान भरपाई मिळालेली नाही.
आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना कंपनीच्या बोगस बियाण्याने आणखी अडचणीत आणले आहे. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभागाकडे लेखी तक्रार देण्यात येणार आहे. मात्र अधिकारी पंचनामे करून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करतात व शेतकऱ्यांवर अन्याय करतात, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शासकीय अधिकारी वा कंपनीचे अधिकारी कोणीही शेतकऱ्यांना त्रास देत असतील, तर आम्ही थेट कृषिमंत्री यांच्याकडे धाव घेऊ.
मोहनीश दोंदे, सरपंच, बेलतगव्हाण