

सिडको (नाशिक) : अंबड पोलिस ठाणे व सातपूर पोलिस ठाण्याचे विभाजन करून गृहविभागाने एमआयडीसी अंबड पोलिस ठाण्याला मान्यता दिली आहे. अंबड नाव दोन ठिकाणी आल्याने एकाच नावाचे दोन पोलिस ठाणे गोंधळ निर्माण करू शकतात. अंबड पोलिस ठाण्याचे नामांतर करून मोरवाडी पोलिस ठाणे,असे नाव देण्यात यावे, अशी मागणी मोरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आ. सीमा हिरे तसेच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आले.
मोरवाडी येथील हजारो एकर जमीन सिडको प्रकल्पासाठी संपादित झालेली असून, त्याअगोदर सातपूर तसेच अंबड येथील जमीन औद्योगिक प्रकल्पासाठी संपादित झालेली आहे. १ ते ६ स्किम विकसित केली असून, सिडको परिसर हा कामगार वस्ती म्हणून ओळखला जातो. उद्योजकांच्या व स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे अंबड पोलिस ठाण्याचे नामांतर करून मोरवाडी पोलिस ठाणे असे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, राजेंद्र महाले, पुष्पा आव्हाड, नाना महाले, पुंजाराम गामणे, किरण दराडे, सुमन सोनवणे, तानाजी जायभावे, साहेबराव आव्हाड, बाळासाहेब सोनवणे, धोंडिराम आव्हाड आदींसह मोरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
अंबड पोलिस ठाण्याचे नामांतर करून मोरवाडी पोलिस ठाणे करण्याचे मोरवाडी ग्रामस्थांनी दिलेले निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
अंबड पोलिस ठाण्याचे मोरवाडी पोलिस ठाणे नामांतर करण्याची मागणी जुनी आहे. यासाठी शासन स्तरावरून पाठपुरावा करणार आहे.
सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ.