

सिडको : पुढारी वृतसेवा
भाड्याने राहण्यासाठी घर घेऊन घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच त्यांच्याच घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, असा फंडा राबवणाऱ्या 'बंटी-बबली' पती-पत्नीला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींविरोधात राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांनी तपासाबद्दल माहिती देताना सांगितले की, फिर्यादी नानासाहेब वाकचौरे (रा. विजयनगर, नाशिक) यांच्या घरातून २३ जूनला सोन्याचे दागिने चोरीसे गेले होते. तपासादरम्यान अंबड पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका संशयित महिलेची हालचाल आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधित महिलेची ओळख निश्चित केली.
आधारकार्ड माहितीआधारे आरोपींचे मोबाइल क्रमांक मिळवत पोलिसांनी बोईसर (जि. पालघर) येथून नवनीत मधुकर नाईक (वय ५६, रा. भांडुप, मुंबई) व त्याची पत्नी स्मिता (वय ४२) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, त्यावेळच्या चोरीतील सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा माल, तसेच ८ मोबाइल फोन, लॅपटॉप व इतर साहित्य असा २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. हे दोघे वेगवेगळ्या शहरांमध्ये भाडेकरू म्हणून राहत होते.
घर घेताना ते कोणताही अधिकृत भाडेकरार करत नसत. तसेच स्वतःचा कायमस्वरूपी पत्ता किंवा खरी ओळखही देत नसत. काही दिवस घरमालकांचा विश्वास संपादन करून योग्य संधी साधत घरातील सोने-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून पसार होत. त्यांच्याविरोधत अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळूज, भोर, बडनेरा, पोयनाड, कोपरगाव, वाशी (मुंबई), सदर बाजार, छावणी, मालेगाव तालुका आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष ठुबे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.