

नाशिकरोड: महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ॲलोपॅथी डॉक्टर शुक्रवारी (दि.११) अत्यावश्यक वगळून सर्व वैद्यकीय सेवाबंद ठेवणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक रोड अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी यांनी पत्रकाव्दारे दिली.
न्यायालयात याचिका असतानाही हा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
फार्माकॉलॉजी या विषयात एक वर्षाचा ब्रिज कोर्स करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाणार आहे. १५ जुलैपासून हा कोर्स सुरू होईल. तो पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर्स रुग्णांना ॲलोपॅथीची औषधे लिहून देऊ शकतील. त्यांना कौंसिलची मान्यता राहणार आहे. फेब्रुवारीत आयएमएने शासनाच्या संभाव्य निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही शासनाने १५ जुलै २०२५ पासून अंमलात येणारा नवीन आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.