

नाशिक : सतीश डोंगरे
पश्चिम आशियातील संघर्षामुळे समुद्री वाहतुकीसमोर निर्माण झालेली अनिश्चितता, वाढता मालवाहतूक खर्च आणि युद्धजोखीम विम्याचा वाढलेल्या भारामुळे निर्यातदारांकडून पर्यायी वाहतूक व्यवस्थेला पसंती मिळू लागली आहे.
याचा थेट फायदा नाशिकच्या हवाई कार्गो सेवेला होताना दिसत आहे. नाशिक विमानतळावरील आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीने २०२५-२६ मध्ये मोठी झेप घेतली. नाशिक विमानतळावर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४ हजार १०० टन आंतरराष्ट्रीय कार्गो २५० मालवाहू उड्डाणांद्वारे हाताळण्यात आला होता. २०२५-२६ मध्ये हा आकडा ९ हजार टनांहून अधिक झाला आहे.
सुमारे ५०० मालवाहू उड्डाणांद्वारे ही वाहतूक झाली आहे. वर्षभरात कार्गोचे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक वाढले आहे. या वाढीचा वेग वर्षाच्या सुरुवातीपासूनच दिसून आला. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत नाशिक विमानतळावरून ४ हजार ५८ टन आंतरराष्ट्रीय कार्गो निर्यात झाला. २०२४ मध्ये याच कालावधीत हा आकडा केवळ १ हजार ५१९ टन होता. म्हणजेच सहामाहीतच तब्बल २५० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
नाशिकच्या निर्यात व्यवस्थेचे आणखी महत्त्वाचे केंद्र असलेल्या जानोरी येथील अंतर्देशीय कंटेनर डेपोमधूनही २०२५-२६ मध्ये ४.०३ लाख टन समुद्री मालवाहतूक झाली. मागील वर्षी हा आकडा ३.७० लाख टन होता. म्हणजेच समुद्री मार्गाशी जोडलेल्या या केंद्रातील मालवाहतुकीतही ८ टक्के वाढ झाली.
या कार्गोचे मूल्य २०२५-२६ मध्ये ३ हजार ४५ कोटी रुपये होते. जानोरी येथून सीमाशुल्क प्रक्रिया व निर्यात कागदपत्रांची पूर्तता करत कंटेनर रस्तामार्गे जेएनपीटीकडे पाठवले जातात. यामुळे नाशिकची निर्यात व्यवस्था आता हवाई कार्गो आणि कंटेनरमार्गे समुद्री निर्यात, अशा दोन्ही वाहतूक पर्यायांवर वेगाने विस्तारताना दिसत आहे.
नाशिकच्या हवाई कार्गो सेवेला मिळालेली चालना ही केवळ युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम नसून, विमानतळावरील तुलनेने कमी कार्गो हाताळणी शुल्क, वाढलेली विमानसेवा, स्थानिक कृषी व औद्योगिक उत्पादनांचा मोठा आधार आणि निर्यातदारांना उपलब्ध होणारी जलद वाहतुकीचा हातभार आहे.
त्यामुळे पश्चिम आशियातील अस्थिरतेने निर्माण केलेल्या आव्हानांत नाशिकने पर्यायी निर्यात वाहतुकीचा मजबूत पर्याय उभा केला आहे. एकीकडे समुद्री मार्गावरील अनिश्चितता वाढत असताना दुसरीकडे नाशिकच्या विमानतळावरील कार्गो सेवेला मिळालेली झेप ही शहराच्या निर्यात अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहे.