Nashik Accident | टोमॅटो वाहतूक करणारा ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी होऊन तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

अहिवंतवाडी-पिंपरी अंचला मार्गावरील दुर्घटना; ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Ahivantwadi Pimpri Anchala Road Accident
पंकज प्रकाश ठाकरे Pudhari
Published on: 
Updated on: 

Ahivantwadi Pimpri Anchala Road Accident

कसबे वणी : रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना अहिवंतवाडी-पिंपरी अंचला मार्गावर घडली. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात टोमॅटो वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात पंकज प्रकाश ठाकरे याचा मृत्यू झाला, तर ओंकार भुसार हा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अहिवंतवाडी येथून टोमॅटो भरून ट्रॅक्टर खोरीफाटा येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जात होता. पहाटेच्या अंधुक प्रकाशात चालकाला रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर थेट खड्ड्यात पलटी झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य करून पंकज ठाकरे आणि ओंकार भुसार या दोघांनाही वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पंकज ठाकरे याचा मृत्यू झाला. ओंकार भुसार याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

Ahivantwadi Pimpri Anchala Road Accident
Industrial Safety Nashik | जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेची ऐसीतैशी

खोदकाम उघडेच; सुरक्षेचे उपाय नाहीत!

या मार्गावर रस्त्याच्या कडेला सुमारे तीन ते चार फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, या धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग, धोक्याचे सूचना फलक किंवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पहाटेच्या अंधुक प्रकाशात वाहनचालकांना रस्त्याची हद्द आणि बाजूला असलेले खोल खड्डे लक्षात येत नाहीत. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे.

ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असली, तरी साईडपट्ट्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. साईडपट्ट्या भरण्यासाठी रस्त्यालगत ठिकठिकाणी खोल खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. अरुंद रस्त्यावरून दोन वाहने समोरासमोर आल्यास एका वाहनाला बाजूला घ्यावे लागते. मात्र, बाजूला सुरक्षित जागाच उपलब्ध नसल्याने वाहनचालकांची मोठी अडचण होत आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठा आणि शेतीमालाच्या वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांवर वर्दळ वाढलेली असताना अशा प्रकारे खोदकाम उघडे ठेवणे धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Ahivantwadi Pimpri Anchala Road Accident
Nashik Water Supply | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना मोठा दिलासा; शहराच्या पाणीपुरवठ्यात दररोज 30 दशलक्ष लिटरची वाढ

ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

रस्त्यांची कामे सुरू असताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र, अनेक ठिकाणी खोदकाम करून ते कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय उघडे ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी, धोकादायक ठिकाणी तातडीने बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावावेत, तसेच अपूर्ण साईडपट्ट्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विकासकामे नागरिकांच्या सुविधेसाठी असतात; मात्र त्याच कामांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर ही बाब गंभीर आहे. एका व्यक्तीचा बळी गेल्यानंतर तरी संबंधित यंत्रणांनी जागे होऊन ग्रामीण भागातील सुरू असलेल्या सर्व रस्त्यांच्या कामांची सुरक्षा तपासणी करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.