

नाशिक : खरीपपूर्व हंगामाच्या महत्त्वपूर्ण बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरण व महावितरणचे अधिकारी विनासूचना अनुपस्थित राहिल्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी (दि. १९) झालेल्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी विविध विभागांकडून आढावा घेतला. बैठकीस ‘लाभक्षेत्र विकास प्राधिकरण’चे अधिकारी गैरहजर होते, तर पणन विभागाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. महावितरणचे अधिकारीही अनुपस्थित होते. या निष्काळजीपणामुळे कृषिमंत्री संतप्त झाले व संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच कारवाईसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याचा इशाराही दिला.
मोहाडी येथील मॅग्नेट प्रकल्पाच्या पूर्णत्वावर कृषिमंत्र्यांनी पणन विभागाला प्रश्न विचारले असता, समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. ‘इतके दिवस काय झोपले होतात का?’ असा सवाल करत त्यांनी प्रकल्पांबाबत केवळ आकडेवारी न देता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी नवीन प्रकल्प राबवण्याचे व अडचणींवर मात करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच मोफत सोलर पंप वितरणाच्या माहितीसाठी अधिकाऱ्याला थेट फोन केल्यावर अर्धवट माहिती मिळाल्याने कृषिमंत्री असंतुष्ट झाले.
बोगस खतविक्री करणार्यांसोबत अधिकार्यांची हातमिळवणी असल्याचे निदर्शनास आल्याबाबत कृषिमंत्री म्हणाले, अशा अधिकार्यांच्या महिनाअखेरपर्यंत बदल्या करण्यात येतील. सर्व घडामोडींवर शासनाची बारीक नजर असून, चांगल्या अधिकार्यांना काम करण्याची संधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.