Nashik | जिल्ह्यात ट्रक-टेम्पोचा चक्का जाम

मागण्यांसंदर्भात ट्रान्स्पोर्ट असो.चा 'जिल्हाधिकारी'वर मोर्चा
Nashik
विविध मागण्यांसदर्भात जिल्ह्यातील वाहतूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चाछाया : हेमंत घोरपडे

नाशिक : ट्रान्स्पोर्ट चालकांच्या समस्यांसंदर्भात नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे गुरुवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या माेर्चात वाहतूकदारांसमवेत चालकदेखील काळ्याफिती लावून सहभागी झाले होते. परिणामी जिल्ह्यातील ट्रक व टेम्पोची चाके जागेवरच थांबली.

Summary

प्रमुख मागण्या

  • - आडगाव ट्रक टर्मिनल येथून इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावा.

  • - जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणून विकसित करावे.

  • - टेम्पो स्टॅण्डसाठी कायमस्वरूपी जागा द्यावी.

  • - राज्यातील चेकपोस्ट बंद करावे.

  • - ट्रक टर्मिनलमध्ये सुरू असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद करावे.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडावा, परिवहन विभागाकडून त्रास कमी करण्यात यावा. तसेच राज्याच्या चेकपोस्टवरील भ्रष्टाचाराला आळा घालावा यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यास विविध सात संघटनांनी पाठिंबा दिला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानपासून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागण्यांचे निवेदन सादर केले गेले. मोर्चात असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी, श्रमिक सेना कार्याध्यक्ष भगवंत पाठक, प्रवासी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे, मोटर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष पी. सी. चढ्ढा, रिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर सय्यद, अंजू सिंगल आदींसह ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक सहभागी झाले होते.

Nashik
Nashik Metro Neo | नाशिकची 'मेट्रो निओ' पुन्हा ट्रॅकवर!

दीड हजार ट्रक ठप्प

ट्रकचालकांनी मोर्चाला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात साधारणत: दीड हजार ट्रक व अवजड वाहने जागेवर उभी होती. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळाले. विविध कंपन्यांमधून होणारी मालवाहतूक आंदोलनामुळे ठप्प पडली. परिणामी, कंपन्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली.

भाजीपाला, दूधपुरवठ्यावर परिणाम

जिल्ह्यातील टेम्पो, टँकर व अन्य मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालकदेखील आंदोलनाचा एक भाग होते. त्यामुळे जिल्ह्यातून मुंबईला भाजीपाल्याचा पुरवठा करणारी शेकडो वाहने थबकली. तर टँकरचालकांअभावी दुधाच्या पुरवठ्यावरदेखील विपरीत परिणाम झाला. भाजीपाला व दुधाची आवक वेळेत न झाल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.

उद्योगमंत्र्यांकडून दखल

आमदार सीमा हिरे यांनी मोर्चाची दखल घेत अधिवेशनाच्या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा करत त्यांचे लक्ष वेधले. उद्योगमंत्र्यांनी सोमवारी मुंबईत त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याची नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला सूचना दिली आहे.

वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. संघटनेच्या वतीने नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतीसह शहराच्या चारही बाजूना ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येऊन येथे इंदूरच्या धर्तीवर 'सारथी सुविधा केंद्र' निर्माण करण्याची मागणी आहे.

- राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news