

सिन्नर ( नाशिक ) : सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारातील परिसरात समृद्धी महामार्गावर क्रमांक 571 येथे रविवारी (दि.14) सकाळी 11 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास भीषण अपघात झाला. किया कारचे (एमएच05, एफबी 7256) टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने महामार्गावर अनेक पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 13 वर्षांखालील सात लहान मुलांसह एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेले नीलेश विजय बुकाणे (वय 38, रा. कल्याण) आणि वैशाली सचिन घुसळे (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
स्थानिक रहिवाशांच्या मदतीने व समृद्धी महामार्गाच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी सिन्नर येथे हलवण्यात आले व गंभीर जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मुंबई कल्याण परिसरातील रहिवासी असलेले हे कुटुंब सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे लग्नसमारंभासाठी जात होते. वर्हाडी मंडळींसाठी दोन बसेस व खासगी वाहने नियोजित करण्यात आली होती. त्यातील एका कारमध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यामध्ये पाच प्रौढ व सात लहान मुलांचा समावेश होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून, समृद्धी महामार्गावरील 571 क्रमांकाजवळ हा अपघात घडला. टायर फुटल्यानंतर कारचा वेग अधिक असल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि कारने महामार्गावर अनेक पलट्या घेतल्या. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जखमी झालेल्या सातही लहान मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. लहान मुलांवर उपचार सुरू असून जे काही ज--ास्त गंभीर होते ते पुढे नाशिक येथे पाठवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. लग्न समारंभ अवघ्या काही तासांवर असतानाच हा दुर्दैवी अपघात झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सिन्नर पोलीस करीत आहेत.