शहरासह ग्रामीण भागात चालू वर्षात ६२९ प्राणांतिक अपघात झाले. त्यात ६७३ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातांची समस्या जैसे थे असल्याचे दिसते. शहरासह ग्रामीण भागातील बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, तरीही वाहतूक नियम मोडल्याने अपघात होत आहेत. त्यातून अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. जिल्ह्यात सरासरी दररोज तिघांचा अपघाती मृत्यू होत आहे. (The problem of accidents in Nashik district seems to be the same)
शहर व ग्रामीण भागात दररोज अपघात होत असतात. त्यात प्राणांतिक अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने, रस्त्यांची दुर्दशा, रस्त्यावरील अंधार, वाहनांचा प्रचंड वेग यामुळे सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये होत आहे. ग्रामीण भागात चालू वर्षात ८४३ अपघात झाले असून, त्यात ५५७ जणांचा मृत्यू झाला, तर ४४६ जण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे शहरात ३२१ अपघात झाले असून, त्यात २९९ नागरिक जखमी झाले आहेत.
शहर पाेलिसांनी चालू वर्षात २८ ऑगस्टपर्यंत एक लाख दोन हजार ६४१ बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करून, सहा कोटी २६ लाख ९६ हजार ७५० रुपयांचा दंड केला आहे. तसेच २३ जणांचा वाहन परवाना निलंबित केला आहे, तर ग्रामीण पोलिसांनी ३५ हजार ४५१ बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून तीन कोटी ६६ लाख ७७ हजार ९५० रुपयांचा दंड आकारला आहे. ५२ चालकांचे वाहन परवाने निलंबित केले आहेत.