शहर व ग्रामीण भागात चालू वर्षात १ जानेवारी ते २३ ऑगस्ट या कालावधीत २३४ बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यात १७ महिलांच्या मृतदेहांचा समावेश आहे. त्यापैकी मोजक्या मृतदेहांची ओळख पटल्याने ते नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र बहुतांश जणांच्या नशिबी बेवारस म्हणूनच अंत्यसंस्कार आले. (In Nashik, 234 dead bodies have been found in urban and rural areas in the year 2024 from January 1 to August 23)
जिल्ह्यात दररोज सरासरी एक जण बेवारस म्हणून या जगाचा निरोप घेत आहे. त्यात वृद्ध व्यक्तींचा सर्वाधिक समावेश असून, ३५ ते ५० वयोगटातील पुरुषांचाही मृत्यू होत आहे. चालू वर्षात २३ ऑगस्टपर्यंत २३५ दिवसांत २३४ बेवारस मृतदेह आढळून आले. सर्वाधिक मृतदेह पंचवटी, सरकारवाडा व नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत आढळले आहेत. बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात, मात्र त्यातील बहुतांश मृतदेहांची ओळख न पटल्याने ते शासकीय कागदोपत्री बेवारस म्हणूनच आहेत. असे मृतदेह आढळल्यानंतर नियमानुसार सात दिवसांच्या आत त्यांच्यावर प्रशासनाच्या वतीनेच अंत्यसंस्कार करणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नसल्याने मृतदेह बरेच दिवस शवागारात सडत असल्याचेही आढळले आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार व शवविच्छेदन अहवालानुसार बेवारस आढळलेल्या व्यक्तींचा मृत्यू दीर्घ आजार, वृद्धत्व, अपघात यांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे असून, तेथे काही पाल्य त्यांच्या वृद्ध पालकांना बेवारस सोडून निघून जात असल्याची प्रकरणे उघड झाली आहेत. त्यामुळे चांगल्या घरातील लोकांनाही अखेरच्या क्षणी निराधार जगणे नशिबी येत असल्याचे वास्तव आहे. पोलिस दप्तरी दाखल नोंदींनुसार पंचवटी येथील धार्मिक स्थळे, नाशिक रोड रेल्वेस्थानक, जिल्हा शासकीय रुग्णालय, मनमाड रेल्वेस्थानक या ठिकाणी सर्वाधिक अनोळखी व्यक्तींचा वावर व मृत्यू झाले आहेत.
काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारांकडून घातपात होऊन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांत मृताचा चेहरा ओळखू येणार नाही, अशा पद्धतीने क्रौर्य केलेले असते. त्यामुळे मृतदेहांची ओळख न पटल्याने ते बेवारस म्हणून शासकीय दप्तरी राहतात, तर दुसरीकडे गुन्हेगारही मोकाट राहतात.