Nashik Accident News | कसारा घाटात टँकर कोसळला; पाच प्रवासी ठार; चार जखमी
इगतपुरी : नाशिक- मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंटजवळ मुंबईकडे जाणारा दुधाचा टँकर ३०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवासी जागीच ठार, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 18) दुपारी 3 च्या सुमारास घडली. अपघातात लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या दुधाचा टँकर दुपारी नाशिकहून मुंबईकडे जात असताना चालकाने वाहनात रस्त्यावरील ठिकठिकाणचे प्रवासी भरले होते. दुपारी 3 च्या सुमारास कासारा घाटात टँकर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने 300 फूट खोल दरीत टँकर कोसळला.
या अपघातात विजय घुगे (60, रा. निमोण, ता. संगमनेर), आरती जायभाय (31, रा. नालासोपारा), सार्थक वाघ (20, रा. निहळ, ता. सिन्नर), रामदास दराडे (50, रा. निहळ, ता. सिन्नर) व चालक योगेश आढाव (रा. राहुरी) हे पाच जण जागीच ठार झाले. तर अक्षय विजय घुगे (30, रा. निमोण, ता. संगमनेर), श्लोक जायभाय (5, रा. नालासोपारा), अनिकेत वाघ (21, रा. निहळ, ता. सिन्नर), मंगेश वाघ (50, रा. निहळ, ता. सिन्नर) जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र व शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्गचे डीवायएसपी प्रदीप मैराळ, कसारा ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मोराळे यांनी पाहणी केली. तर सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. होंडे, पोलिस उपनिरीक्षक पी. साळुंके, कर्मचारी सुनील खताळ, अमोल केदारे, सचिन बेंडकुळी, प्रवीण चासकर यांनी मदतकार्य केले.
पावसाने मदतकार्यात अडथळा
अपघातानंतर रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यातच जोराचा पाऊस सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. मात्र तरीही आपत्ती व्यवस्थापन पथकाने दोरीच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रवाना केले.

