इगतपुरी : गेल्या २४ तासांपासून इगतपुरी व कसारा घाटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर शनिवार दि. ३ रोजी सकाळी ८ः३० वाजेच्या सुमारास दरड कोसळली.
ही दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायरवर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त होऊन तुटली आहे. यामुळे मुंबईला जाणारी अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळवण्यात आल्याने मुंबईला जाणारी रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली.
विषेश म्हणजे काही मिनीटांपुर्वीच या रेल्वे लाईनवरून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईला रवाना झाली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दरड हटविण्याचे व ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. यामुळे अप लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.